Showing posts with label पहा वाचा ऐका.... Show all posts
Showing posts with label पहा वाचा ऐका.... Show all posts

Wednesday, 2 January 2013

थिंक महाराष्ट्र


वृत्तपत्रांतून, मासिकांतून आपण नेहमी एक ठराविक विषय ऎकत वाचत असतो. त्यात सत्तेचं राजकारण, वाढती गुंडगिरी या पुढे आपल्या रोजच्या वाचनाचे विषय जात नाहीत. या सर्व बातम्यांमधे, लोखांमधे एक निराशावादी सूरच ऎकायला मिळतो. जगात काही चांगलं चाललं आहे की नाही असाच प्रश्न पडायला लागतो. याच निराशावादी भावनेला छेद देण्यासाठी www.thinkmaharashtra.com ही संकेतस्थळ नक्कीच नक्की पहा.


इंटरनेटने अख्ख्या जगाला आपल्या समोरच्या (किंवा हातातल्या) यंत्रावर आणून ठेवले. आता जग म्हटलं की बहुधा आपला देश सोडूनच गोष्टी बोलल्या जातात, त्यात तुलनेने आपण राहतो त्या महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांनी, तालुक्यांनी, शहरांनी, गावांनी एकमेकांना जोडून घ्यायचे राहून जाण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून निघालेली कल्पना म्हणजे 'थिंक महाराष्ट्र'. या गटातर्फे महाराष्ट्रीय समाजातील आत्मविश्वास जागा होण्यास चालना द्यावी असे ठरवण्यात आले आहे. त्यासाठी त्यांच्याकडचे तीन उपक्रम असे-
१) मराठी कर्तृत्वाची जिल्हा, राज्य, राष्ट्र-आंतरराष्ट्र पातळींवरील नोंद
२) स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांच्या कामचा आढावा.
३) मराठी समाज व संस्कृती यांच्यासंबंधात माहिती-संकलन.

वाढत्या 'ग्लोबल' वातावरणात आपले 'लोकल' स्वरूप झपाट्याने नष्ट होत असल्याची भावना सर्वत्र आहे. 'थिंक महाराष्ट्र' मार्फत महाराष्ट्रीय समाजापुरता या भावनेचा आदर करून या प्रदेशाचे व संस्कृतीचे संचित जपण्यासाठी हे उपक्रम उपयोगी ठरतील.

-  प्रज्ञा शिदोरे

Monday, 31 December 2012

स्वातंत्र्यासाठी !


जर्मनीच्या गटेनबर्गने पंधराव्या शतकात छपाईतंत्राचा शोध लावला आणि जग बदलूनच गेलं. पुस्तकं स्वस्त झाली. ज्ञानाचा प्रसार झपाट्याने व्हायला लागला. याआधी लोकांपर्यंत विचार पोचवणं अतिशय कठीण काम होतं. पण आता लोक आपले विचार पुस्तकात लिहून इतरांपर्यंत पोचवू लागले.
पण वेगळ्या, मुक्त विचारांवर बंदी घालण्याचं काम जगाच्या सगळ्या भागातील सत्ताधारी, हितसंबंधी, धार्मिक गटांनी केलं. पुस्तकांमार्फत वेगळे विचार पसरले तर आपले अधिकार-सत्ता धोक्यात येईल अशी भीती वाटल्याने जगभर असंख्य पुस्तकांवर बंदी घालण्यात आली. भारतातही स्वा.सावरकरांच्या पुस्तकांवर ब्रिटिशांनी बंदी घातली होती!
माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्याही परिस्थितीत बंधन येता कामा नये, या विचाराने इंग्लंडमधील काही संस्था आणि ग्रंथालये एकत्र आली आणि त्यांनी सुरु केली एक वेबसाईट! यावर त्यांनी जगातील वेगवेगळ्या देशात बंदी घातलेल्या प्रसिद्ध पुस्तकांची यादी दिली आहे. यामध्ये शेक्सपिअर पासून ते जॉर्ज ऑरवेल, वॉल्तेअर, कार्ल मार्क्स, सलमान रश्दी यांच्यापर्यंत असंख्य प्रसिद्ध लेखकांची पुस्तके आहेत.
विविध कारणांनी पुस्तकांवर बंदी घालण्यात येते. बहुतांश पुस्तकांच्या बाबतीत बंदी घालण्याचे कारण राजकीय-धार्मिक किंवा लैंगिकतेबाबत आक्षेपार्ह मजकूर हे तर काहींच्या बाबतीत आत्यंतिक हिंसक भाषा हेही आहे.
तरीही ज्ञानावर, विचारांवर, विचार मांडण्याच्या मूलभूत स्वातंत्र्यावर कोणाचेही बंधन आणि सेन्सॉरशिप असता कामा नये असा विचार ही वेबसाईट बनवणाऱ्या मंडळींनी मांडला आहे. “साहित्यातील सेन्सॉरशिपला आव्हान देणे” हेच यांचे ब्रीदवाक्य आहे. साहित्यातील स्वातंत्र्यासाठी तयार झालेली वेबसाईट,
नक्की पहा- http://www.banned-books.org.uk/


 
-  तन्मय कानिटकर

Monday, 17 December 2012

आपलं घर...

आपल्या घराच्या, म्हणजे आपल्या पृथ्वीच्या ४.५ अब्ज वर्षांच्या इतिहासात मानवाचे आयुष्य केवळ २ लाख वर्षांचे वर्षांचे. त्यातही प्रगत मानवाचे आयुष्य ५० हजार वर्षांहून अधिक नाही. तरीही मानवजातीनेयाच्या इतिहासात हा पृथ्वीवर काही अमुलाग्र आणि अपरिवर्तनीय बदल घडवले.पृथ्वीच्या वातावरणामधले बदल सध्या कितीही बलाढ्य अर्थव्यवस्था असलेला देश असला तरी त्याला मुळापासून हलवून सोडत आहेत.


मानवी कारणांमुळे होणारे वातावरणातले बदल, त्याने एकूणच जीवसृष्टीवर होणारे घातक परिणाम याबद्दल आपण सततच ऐकत आलो आहोत. साधारण याच संकल्पानेवर आधारलेला माहितीपट असला तरी “होम” या सगळ्यांपेक्षा अनेक अर्थांनी वेगळा आहे.त्यातला सर्वात महत्वाचा फरक म्हणजे हा संपूर्ण माहितीपट एरिअल चित्रीकरणातून साकारला गेला आहे. एकूण ५४ देशांमधून १२० जागांवर हे चित्रीकरण जवळजवळ वर्षभर सुरु होते. दुसरा आणि महत्वाचा फरक म्हणजे या हा माहितीपट सगळीकडे विनामुल्य दाखवला गेला.हा माहितीपट आपल्या पृथ्वीच्या बदलांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारा आहे. त्याच बरोबर याच्या चित्रीकरणाच्या पद्धतीमुळे आपण कधीही पाहिली नसतील अशी अवकाशी दृश्यही आपल्याला पाहायला मिळतील.या चित्रपटाद्वारे समाजात काही सकारात्मक बदल घडावा, माणसाने आपल्या राहणीमानाचा पुनर्विचार करावा अशी या दिग्दर्शिकाची आशा आहे
काही शास्त्रज्ञांच्या मते मानवाने पृथीवर केलेल्या बदलांमुळे आपल्या एकमेव घरावर येणारी अरिष्टे टाळायची असतील तर आपल्याकडे जास्तजास्त १० वर्षांचा काळ आहे.म्हणूनच या माहितीपटाचे महत्व अधिक.

नक्की पहा दीड तासाचा हा माहितीपट- “होम” http://www.youtube.com/watch?gl=NG&list=PL0F367C6043EA950B&feature=plcp&hl=en-GB&v=jqxENMKaeCU



प्रज्ञा शिदोरे

(दि. १४ डिसेंबर २०१२ रोजी दै लोकमत मध्ये प्रसिद्ध- http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-14-12-2012-c9a5b&ndate=2012-12-14&editionname=oxygen

Friday, 30 November 2012

आयुष्याचे मॅन्युएल


माणसाने आयुष्य कसे जगावे, समाजातील नीती नियम काय असावेत याबद्दल आपल्याला लहानपणापासून काही गोष्टी शिकवल्या जातात. आपला धर्म हा आपले हे नीती नियम ठरवण्यात फार महत्वाची भूमिका बजावतो. आज धार्मिक विद्वेषाच्या आणि दहशतवादाच्या जगात असताना थोडक्यातच पण खूप काही सांगून जाणारा हा लघुपट नक्की बघाच..!
हे असेच का असते, वेगळे का नाही असे बालमनाला पडणारे सहज सुलभ प्रश्न नितीनियमांमध्ये बदल करण्यास बहुतांशवेळा तयार नसणाऱ्या पालकांच्या विरोधात दबून जातात, नष्ट होतात. स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय आणि क्षमताच जणू नष्ट होते.
या लघुपटातील छोटा नायक मात्र ठरवतो की, आयुष्य जगायचे जे नियम एका पुस्तकातून मला सांगितले आहेत त्याचा वेगळा अर्थ मी लावणार किंवा ते सोडून देऊन मी वेगळेच काहीतरी निर्माण करणार!

कोणत्याही परिवर्तनाला घाबरून असणारा पांढरपेशा समाज, बदलाला विरोध करणारे पारंपारिक विचारसरणीचे लोक, हे वागणे बरोबर ते वागणे चूक असे काहीतरी ठरवल्याने व्यक्तिगत आयुष्यात काहीतरी गमावणे, वेगळे काहीतरी करणाऱ्यांबद्दल पांढरपेशा समाजाला असलेली अढी अशा विविध गोष्टी दाखवत हा लघुपट फार सुंदरपणे पुढे सरकतो.
अखेर मात्र लघुपटाचा छोटा नायक निर्धाराने बदल करतो आणि जगाला तोंड देतो. त्याच्या लक्षात येतं की असे बदल करणाऱ्या मंडळींनी जग किती सुंदर आणि वैविध्यपूर्ण करून ठेवलं आहे!
सुंदर एनिमेशन, ‘कपाट व ड्रौवर’ यांचा अत्यंत प्रभावी प्रतीकात्मक उपयोग यामुळे हा लघुपट वेगळीच उंची गाठतो. थेरामीन ट्रीज आणि क्वलीया सूप दोन भावांनी मिळून या अप्रतिम लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.
नक्की बघा ८ मिनिटांचा लघुपट ‘आयुष्याचे मैन्युएल’ अर्थात- Instruction Manual for Life!

- तन्मय कानिटकर

(दि. ३० नोव्हेंबरच्या दै. लोकमत मध्ये प्रसिद्ध http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-29-11-2012-ea98a&ndate=2012-11-30&editionname=oxygen )

Monday, 26 November 2012

जमीन कोणाची?


जगाच्या सर्व भागात एखादा भूप्रदेश कोणाचा आहे यावरून वर्षानुवर्षे भीषण युद्धे झाली. आपल्या भारताची पाकिस्तान आणि चीन या शेजाऱ्यांशी मुख्यत्वे याच मुद्द्यावरून युद्धे झाली आहेत. युरोप, आफ्रिका, आग्नेय आशिया, आखाती देश, सर्वत्रच अमुक अमुक जमीन कोणाची यावरून युद्धे झाली आहेत आणि अजूनही सुरूच आहेत.
या युद्धांमध्ये प्रचंड रक्तपात होतो आणि कित्येक निष्पाप नाहक मारले जातात, कित्येक सैनिक शहीद होतात.
असाच एक रक्तरंजित इतिहास असलेला भूप्रदेश म्हणजे इस्त्रायल-पैलेस्टाइन. ‘जेरुसलेम’च्या आसपासचा प्रदेश. सतत युद्धजन्य. या भूभागावर कित्येक वंशाच्या, धर्माच्या लोकांनी राज्ये केली. हा भूभाग मिळवण्यासाठी लाखो लोक मारले गेले. असिरीयन, इजिप्शियन, बायझेन्टाइन, बाबिलोनियन, ग्रीक, रोमन, ख्रिश्चन क्रुसेडर, अरब, तुर्क, ब्रिटीश, ज्यू, पैलेस्टिनी मुस्लीम, इस्त्रायली लष्कर, पैलेस्टिनी सैनिक...कितीतरी लोकांनी या जमिनीवर रक्त सांडले! 
गेल्या शेकडो वर्षात या भूमीवर सातत्याने लढाया झाल्या. आणि अंतिमतः विजय प्रत्येकवेळी मृत्युच्या दूताचाच झाला हे अतिशय सुटसुटीत सोप्या पण प्रभावीपणे एनिमेशनच्या सहाय्याने या अवघ्या ३ मिनिटांच्या फिल्म मध्ये दाखवण्यात आले आहे. प्रत्येक वंशाचा-धर्माचा राजा आधीच्या राजाला मारून त्या भूमीवर येतो आणि ‘धिस लैंड इज माइन’ (ही जमीन माझी आहे) असे गातो. पण त्याचीही तीच गत होते जी आधीच्या राजांची झाली.

युद्धांचा शेवट हा मृत्युच्या भीषण अशा तांडवात होतो.
आजच्या सर्वत्र अस्थिरता पसरलेल्या जगात, दहशतवादाच्या आणि अणूयुद्धाच्या छायेत आपण असताना हा चित्रपट जागतिक शांतता आणि सलोख्याचा संदेश देतो. आवर्जून बघा हा लघुपट- This land is Mine!

-    - तन्मय कानिटकर
ग्रीनअर्थ

(दि. २३ नोव्हेंबर २०१२ रोजी दै. लोकमत मध्ये प्रसिद्ध. http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-22-11-2012-f2913&ndate=2012-11-23&editionname=oxygen) 

Friday, 2 November 2012

पैशाची गोष्ट


गेल्या काही वर्षात जगात, विशेषतः पाश्चिमात्य देशात निर्माण झालेल्या आर्थिक प्रश्नांमुळे, अनेक देशांच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थांमुळे जगभरचे अर्थतज्ञ या विषयात आपले डोके घालून यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत.

भारतातही नुकतेच काही महत्वपूर्ण निर्णय घेत सरकारने आर्थिक सुधारणांची घोषणा केली. त्यावर विरोध-पाठींबा असे खेळ चालू आहेतच. यासगळ्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिक म्हणून नेमका पैसा निर्माण कसा होतो आणि त्यासंदर्भातले भीषण प्रश्न उभे कसे राहतात हे आपण माहित करून घ्यायला हवं.
पण अर्थशास्त्र हा किती किचकट आणि कंटाळवाणा वाटणारा विषय! अशा विषयात रस कसा वाटणार?!

कदाचित याच विचारांनी ‘इडो झैफमन’ नावाच्या व्यक्तीने एक अवघ्या ४ मिनिटांचा माहितीपट बनवला आहे, ज्याचे नाव आहे “द मेकिंग ऑफ मनी” म्हणजेच पैशाच्या निर्मितीची गोष्ट! (‘मनी मेकिंग’ची म्हणजे पैसा कमावण्याची गोष्ट नव्हे!). “द मेकिंग ऑफ मनी” असं नाव देत दिग्दर्शकाने सुरुवातीलाच सुंदर श्लेष साधला आहे.
ही आहे पैशाची गोष्ट! इतिहासपूर्व काळातील वस्तूंची देवाण घेवाण असलेली बार्टर पद्धत ते सोन्याच्या बदल्यात मिळणारा कागदी पैसा, आणि आता सोन्याशिवायच निर्माण होत जाणारा पैसा अशी रंजक मांडणी करत हा माहितीपट पुढे सरकतो. पैसा कसा निर्माण होतो हे सांगतानाच आता या पैशामुळे नेमका प्रश्न कसा निर्माण झाला आहे हेही आपल्यासमोर येते.


आणि अखेर यावर काहीतरी ठोस उपाय करायला हवा आहे हे सांगतानाच कोणत्याही बदलाची सुरुवात स्वतःपासून होते या महात्मा गांधींच्या वाक्याची आठवण करून देत माहितीपट संपतो.

एनिमेशनचा सुंदर वापर, थोडक्यात पण नेमकी माहिती आणि अवघी ४ मिनिटांची लांबी या शॉर्टफिल्मच्या जमेच्या बाजू!

नक्की पहा- “द मेकिंग ऑफ मनी” http://www.filmsforaction.org/Watch/The_making_of_money/


-    तन्मय कानिटकर


Monday, 29 October 2012

तेलाची गोष्ट!

इंधन आपल्या आधुनिक जगाचा अविभाज्य भाग बनले आहे. खरंतर १५० वर्षांपूर्वी जेव्हा खनिज तेलाचा वापर सुरु झाला तेव्हापासून या तेलानेच आपण आज जे जग पाहतो आहोत ते घडवलं (किंवा बिघडवलं) आहे.

काही आठवड्यापूर्वी जेव्हा या खनिज तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेल जे भाव वाढवण्यात आले तेव्हा आपल्याकडे केवढा वादंग मजला होता. विरोधक सरकार पाडण्याच्या पवित्र्यात होते. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरीकांच कंबरडं मोडेल असा विरोधकांचा दावा होता.
हो, आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी हे खनिज तेल लागतं. खनिज तेल आपली अर्थव्यवस्थेचा पाया आहे. हे आपल्याला उष्मा देतं, आपल्याला आवश्यक वस्तू आपल्यापर्यंत पोचवतं. आपल्याला आपल्या आप्तेष्टांच्या जवळ नेतं, यानेच आपलं जग आपल्या जवळ आणलं आहे. आपण ज्या प्रमाणात हे तेल वापरतो आहोत, ज्या प्रकारे हे मिळवतो आहोत, त्याच्या मुळाशी खूप मोठी आव्हाने आहेत कारण या तेलानेच खूप मोठी युद्धेही झाली आहेत.

जॉश टिकेल यांनी २००८ मध्ये प्रकाशित आपल्या ‘FUEL’ या लघुपटात या राजकीय आणि आर्थिकदृष्टया ज्वलंत अशा खनिज तेलाची गोष्ट आपल्याला सांगितली आहे.
जॉश यांनी या तेलामुळे निर्माण कोणकोणत्या समस्या निर्माण होतात आणि त्या आत्ताच पावले उचलली तर कशा टाळल्याही जाऊ शकतात यावर भाष्य केले आहे.

तेव्हा हा मनोरंजक आणि आपल्या रोजच्या जगण्यामध्ये काही सकारात्मक बदल करण्यासाठी, आपल्याला आपल्या वाढलेल्या, आपणच वाढवून ठेवलेल्या गरजांबद्दल पुनर्विचार करायला लावणारा हा लघुपट आजच पहा.
‘FUEL’ या लघुपट आपण YouTube वर पाहू शकता.
http://www.youtube.com/watch?v=v3CBOdgBlk8&feature=watch-now-button&wide=1

-प्रज्ञा शिदोरे


(दि. २६ ऑक्टोबर २०१२ च्या दै. लोकमत मध्ये प्रसिद्ध- http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-25-10-2012-42336&ndate=2012-10-26&editionname=oxygen )

Friday, 19 October 2012

ई-कचऱ्याचा यक्षप्रश्न


पुण्याजवळ उरुळी देवाची इथे कचरा डेपो आहे. काही महिन्यांपूर्वी तिथल्या ग्रामस्थांनी आंदोलन करून पुण्यातून जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून ठेवल्या होत्या. त्यावेळी अख्ख्या शहरातला कचरा उचलला गेला नसल्याने पुणेकरांना कचरा प्रश्नाची झलक बघायला मिळाली होती. जगातल्या अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये कचरा व्यवस्थापन हा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचप्रमाणे जगाला सध्या भेडसावणारी एक उग्र समस्या म्हणजे ई-कचरा आणि या समस्येची ओळख करून देणारा हा छोटेखानी माहितीपट!

कम्प्युटर-इंटरनेट पाठोपाठ माहिती तंत्रज्ञान जगात क्रांती झाली आणि अक्षरशः शेकडो काही ‘शे’ कोटी लोकांच्या हातात मोबाईल आले. जुने टीव्ही जाऊन नवीन टीव्ही आले. एलसीडी, एलईडी वगैरे प्रकार आले. काल आयफोन-४ असला तर आज आयफोन-५ आलासुद्धा! या सगळ्या प्रक्रियेत लोक भराभर जुन्या गोष्टी टाकून अधिक आधुनिक, सर्वात नव्या इलेक्ट्रोनिक गोष्टी विकत घेऊ लागले. जागतिकीकरण आणि बाजारीकरणाच्या या रेट्यात हा वेग प्रचंड वाढला. त्याच प्रमाणात वाढत गेला ई-कचरा. मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर या सगळ्या गोष्टी टाकून दिल्यावर त्याचं होतं काय, हे या माहितीपटात साध्या सुटसुटीत पण प्रभावी ऐनिमेशनचा वापर करत सांगितले आहे.

इलेक्ट्रोनिक वस्तू बनतात कशा आणि त्याचे रुपांतर विषारी ई-कचऱ्यामध्ये कसे होते हे या माहितीपटात रंजक पद्धतीने दाखवले आहे. सोबतच ‘एनी लिओनार्ड’ हिचे प्रभावी सूत्रसंचालन प्रेक्षकाला खिळवून ठेवते.

दरवर्षी जगात तब्बल अडीच कोटी टन ई-कचरा तयार होतो. इतका हा प्रश्न भीषण बनला आहे. एक जागरूक नागरिक म्हणून या प्रश्नाची किमान माहिती करून घेण्यासाठी आपण ८ मिनिटे नक्कीच घालवू शकतो!


- तन्मय कानिटकर


(दि. १९ ऑक्टोबरच्या दै. लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रसिद्ध http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-18-10-2012-3cadb&ndate=2012-10-19&editionname=oxygen)

Tuesday, 9 October 2012

भला मोठ्ठा मी!


अमेरिका जशी स्वत:ला आर्थिक दृष्टीने अग्रगण्य म्हणवते तशीच ती टाळल्या जाऊ शकणाऱ्या आजारांतही सर्वात पुढे आहे. आणि त्यात सर्वात पहिला नंबर लागतो तो म्हणजे लठ्ठपणाचा. अमेरिकेला आज याचमुळे आर्थिक संकटाबरोबरच या आरोग्य संकटाने ग्रासले आहे. अमेरिका त्यामुळे जगात सर्वात ‘लट्ठ’ राष्ट्र बनले आहे. या लठ्ठपणाचं मुख्य करण म्हणजे तेथील मकडॉनल्डस् सारख्या ‘फास्ट-फूड चेन्स’.
याच ‘नव्या अमेरिकन खाद्यसंस्कृती’चा अभ्यास केला मोर्गन स्परलॉक या लघुपट निर्मात्याने. त्याने स्वत:वरच एक प्रयोग केला. त्याने ३० दिवस फक्त आणि फक्त मकडॉनल्डस् मधलं अन्न खाल्लं आणि स्व:च्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. त्यात असं लक्षात आलं की वजनात, चरबीत वाढ, यकृत खराब होणे अशा शारीरिक परिणामांबरोबरच डिप्रेशन-उत्साह न वाटणे इत्यादी मानसिक आजारही झाले. या ‘फास्ट-फूडस्’मध्ये पोषक अन्नाचं प्रमाण अत्यल्प आणि शरीराला घातक अशा चरबीयुक्त पदार्थाचं प्रमाणाच जास्त आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ‘फास्ट-फूड चेन्स’ लहान मुलांना कधी खेळणं देऊन तर कधी विदूषकाबरोबर छायाचित्र काढून देऊन भुलवत आहेत. आणि त्याना कमी पोषण देणाऱ्या अन्नाची सवय लावून त्यांचं आरोग्य कायमसाठी खराब करत आहे.
भारतामध्येही आता अशा ‘फास्ट-फूड चेन्स’ उघडत आहेत. म्हणून आपण ग्राहक म्हणून योग्य निवड केली पाहिजे!
या अन्नाने नक्की शरीरावर नक्की कसा फरक पडतो, यावर आधारित आर्थिक हितसंबंध समजून घेण्यासाठी नक्की पहा ‘Super Size me’ ह लघुपट.
You Tube वर ‘Super Size me’ असं search करा 

-  प्रज्ञा शिदोरे

(दि. ५ ऑक्टोबर २०१२ च्या दै.लोकमत मध्ये प्रसिद्ध http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-04-10-2012-e85e0&ndate=2012-10-05&editionname=oxygen)