जगाच्या सर्व भागात एखादा भूप्रदेश कोणाचा आहे
यावरून वर्षानुवर्षे भीषण युद्धे झाली. आपल्या भारताची पाकिस्तान आणि चीन या
शेजाऱ्यांशी मुख्यत्वे याच मुद्द्यावरून युद्धे झाली आहेत. युरोप, आफ्रिका, आग्नेय
आशिया, आखाती देश, सर्वत्रच अमुक अमुक जमीन कोणाची यावरून युद्धे झाली आहेत आणि
अजूनही सुरूच आहेत.
या युद्धांमध्ये प्रचंड रक्तपात होतो आणि कित्येक निष्पाप नाहक मारले
जातात, कित्येक सैनिक शहीद होतात.
असाच एक रक्तरंजित इतिहास असलेला भूप्रदेश म्हणजे
इस्त्रायल-पैलेस्टाइन. ‘जेरुसलेम’च्या आसपासचा प्रदेश. सतत युद्धजन्य. या भूभागावर
कित्येक वंशाच्या, धर्माच्या लोकांनी राज्ये केली. हा भूभाग मिळवण्यासाठी लाखो लोक
मारले गेले. असिरीयन, इजिप्शियन, बायझेन्टाइन, बाबिलोनियन, ग्रीक, रोमन, ख्रिश्चन
क्रुसेडर, अरब, तुर्क, ब्रिटीश, ज्यू, पैलेस्टिनी मुस्लीम, इस्त्रायली लष्कर,
पैलेस्टिनी सैनिक...कितीतरी लोकांनी या जमिनीवर रक्त सांडले!
गेल्या शेकडो वर्षात या भूमीवर सातत्याने लढाया
झाल्या. आणि अंतिमतः विजय प्रत्येकवेळी मृत्युच्या दूताचाच झाला हे अतिशय सुटसुटीत
सोप्या पण प्रभावीपणे एनिमेशनच्या सहाय्याने या अवघ्या ३ मिनिटांच्या फिल्म मध्ये
दाखवण्यात आले आहे. प्रत्येक वंशाचा-धर्माचा राजा आधीच्या राजाला मारून त्या
भूमीवर येतो आणि ‘धिस लैंड इज माइन’ (ही जमीन माझी आहे) असे गातो. पण त्याचीही तीच
गत होते जी आधीच्या राजांची झाली.
युद्धांचा शेवट हा मृत्युच्या भीषण अशा तांडवात होतो.
आजच्या सर्वत्र अस्थिरता पसरलेल्या जगात, दहशतवादाच्या आणि अणूयुद्धाच्या
छायेत आपण असताना हा चित्रपट जागतिक शांतता आणि सलोख्याचा संदेश देतो. आवर्जून बघा
हा लघुपट- This land is Mine!
ग्रीनअर्थ
(दि. २३ नोव्हेंबर २०१२
रोजी दै. लोकमत मध्ये प्रसिद्ध. http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-22-11-2012-f2913&ndate=2012-11-23&editionname=oxygen)
No comments:
Post a Comment