Monday 31 December 2012

स्वातंत्र्यासाठी !


जर्मनीच्या गटेनबर्गने पंधराव्या शतकात छपाईतंत्राचा शोध लावला आणि जग बदलूनच गेलं. पुस्तकं स्वस्त झाली. ज्ञानाचा प्रसार झपाट्याने व्हायला लागला. याआधी लोकांपर्यंत विचार पोचवणं अतिशय कठीण काम होतं. पण आता लोक आपले विचार पुस्तकात लिहून इतरांपर्यंत पोचवू लागले.
पण वेगळ्या, मुक्त विचारांवर बंदी घालण्याचं काम जगाच्या सगळ्या भागातील सत्ताधारी, हितसंबंधी, धार्मिक गटांनी केलं. पुस्तकांमार्फत वेगळे विचार पसरले तर आपले अधिकार-सत्ता धोक्यात येईल अशी भीती वाटल्याने जगभर असंख्य पुस्तकांवर बंदी घालण्यात आली. भारतातही स्वा.सावरकरांच्या पुस्तकांवर ब्रिटिशांनी बंदी घातली होती!
माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्याही परिस्थितीत बंधन येता कामा नये, या विचाराने इंग्लंडमधील काही संस्था आणि ग्रंथालये एकत्र आली आणि त्यांनी सुरु केली एक वेबसाईट! यावर त्यांनी जगातील वेगवेगळ्या देशात बंदी घातलेल्या प्रसिद्ध पुस्तकांची यादी दिली आहे. यामध्ये शेक्सपिअर पासून ते जॉर्ज ऑरवेल, वॉल्तेअर, कार्ल मार्क्स, सलमान रश्दी यांच्यापर्यंत असंख्य प्रसिद्ध लेखकांची पुस्तके आहेत.
विविध कारणांनी पुस्तकांवर बंदी घालण्यात येते. बहुतांश पुस्तकांच्या बाबतीत बंदी घालण्याचे कारण राजकीय-धार्मिक किंवा लैंगिकतेबाबत आक्षेपार्ह मजकूर हे तर काहींच्या बाबतीत आत्यंतिक हिंसक भाषा हेही आहे.
तरीही ज्ञानावर, विचारांवर, विचार मांडण्याच्या मूलभूत स्वातंत्र्यावर कोणाचेही बंधन आणि सेन्सॉरशिप असता कामा नये असा विचार ही वेबसाईट बनवणाऱ्या मंडळींनी मांडला आहे. “साहित्यातील सेन्सॉरशिपला आव्हान देणे” हेच यांचे ब्रीदवाक्य आहे. साहित्यातील स्वातंत्र्यासाठी तयार झालेली वेबसाईट,
नक्की पहा- http://www.banned-books.org.uk/


 
 तन्मय कानिटकर

No comments:

Post a Comment