Friday 28 September 2012

पाण्याच्या बाटलीची गोष्ट

ही गोष्ट आहे आपली. माणसाच्या आणि या निसर्गाच्या नात्याची. वस्तुंच्या मोहापायी माणूस निसर्गाला विसरून गेला त्याची.
कधी विचार केला आहे, आपण वापरलेल्या गोष्टी आपण टाकून दिल्यावर त्याचं काय होतं? हो, बरोबर, त्या कचऱ्यात जाऊन पडतात. पण मग त्या कचऱ्याच काय होतं? तो कुठे जातो? कुठे साठवला जातो? या सगळ्या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला ‘The story of Bottled water’ या animation film मधून मिळतात.
आज आपण कुठे घराच्या बाहेर गेलो, सिनेमा किंवा सहलीला गेलो तर आपल्याला पाणी आणि अनेक शीतपेये प्लास्टिकच्या बाटल्यांमधून उपलब्ध होतात. वागवायला सोपे म्हणून आपण अशा बाटल्या विकतही घेतो. अनेक जाहिरातींद्वारे आपल्यावर ते पाणी कसं काश्मीर किंवा अशाच कोणत्यातरी झऱ्यातून गोळा केलं गेलं आहे असं सांगण्यात येतं. पण खरी परिस्थिती ही या पेक्षा फार वेगळी आहे. आपण घरी स्वच्छ केलेलं पाणी आणि या बाटल्यांमधून मिळाणारं पाणी यामध्ये गुणात्मक फरक फारच कमी असतो. पण हे बाटलीतलं पाणी प्रदूषण तर करताच पण त्याहूनही अधिक घातक म्हणजे आपल्या भूगर्भात असलेला पाण्याचा साठाही कमी करतं. हे प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी साध्या पाण्यापेक्षा अनेक हजार पटीने महाग असतं हे वेगळंच! वर अशा बाटल्यांच्या कचऱ्याचा खच हे ‘विकसित देश’ आपल्या सारख्या विकसनशील देशात येऊन टाकतात.
या गोष्टीचा शेवट सुखद करायचा का दु:खद हे आपल्याचं हातात आहे. त्यासाठी याविषयावरची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे.
नक्की पहा.. केवळ ८ मिनिटांचा हा लघुपट ‘The Story of Bottled Water  http://www.youtube.com/watch?v=Se12y9hSOM0

-    प्रज्ञा शिदोरे

(दि. २८ सप्टेंबरच्या दै. लोकमत मध्ये प्रसिद्ध )

Monday 24 September 2012

पर्यावरण (अ)सत्य-स्थिती अहवाल


पश्चिम घाटावरचा पर्यावरण अहवाल जितका वास्तवदर्शी आहे,तितकाच पुणे शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल अवास्तवदर्शी आहे. सत्य परिस्थिती सांगणे सोडून हा अहवाल पर्यावरणाचे रम्य दर्शन घडवतो,खोट्या गोष्टी छातीठोकपणे सांगतो आणि महत्त्वाचे घटक दुर्लक्षित करतो.
तीनच महिन्यांपूर्वी पश्चिम घाटावरील तज्ञ समितीने माधव गाडगीळांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चिकाटीने अभ्यास करून निर्माण केलेला पश्चिम घाटाचा सद्य परिस्थिती अहवाल केंद्रीय माहिती आयोगाने (सेंट्रल इन्फर्मेशन कमिशन) जनतेसमोर मांडला. पश्चिम घाटातील जैवविविधतेबाबत सावधानतेचा इशारा देणारे सत्य रूप लोकांसमोर आणले. पर्यावरणवाद्यांचा भक्कम पाठिंबा आणि सरकारचा व मोठमोठ्या उद्योजकांचा विरोध यामध्ये तो अहवाल सध्या अडकला आहे. हे प्रकरण सुरु असतानाच पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने पुणे शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०११-१२प्रसिध्द केला. पश्चिम घाटावरचा पर्यावरण अहवाल जितका वास्तवदर्शी आहे, तितकाच पुणे शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल अवास्तवदर्शी आहे. सत्य परिस्थिती सांगणे सोडून हा अहवाल पर्यावरणाचे रम्य दर्शन घडवतो, खोट्या गोष्टी छातीठोकपणे सांगतो आणि महत्त्वाचे घटक दुर्लक्षित करतो.
निसर्गात मानव बलशाली झाल्यापासून मानवकेंद्रित व मानवेतर असे पर्यावरणाचे ढोबळ पण वास्तविक विभाजन झाले. जसजशी लोकसंख्या वाढली, तशी शहरे वाढली व या वाढीला सामावून घेण्यासाठी मानवाची पर्यावरणातील टक्केवारी अशा गतीने वाढली, की त्या वाढीला हस्तक्षेप म्हणावे लागले. असे होत असताना आपण ज्याचे मूर्त घटक आहोत त्या पर्यावरणाची काळजी आपण घेतली पाहिजे व त्यासाठी पर्यावरणीय परिस्थितीचा गुणात्मक व संख्यात्मक अभ्यास केला पाहिजे. पर्यावरणाबाबत आपली बांधिलकी लक्षात घेऊन घटनेत ७४वी दुरुस्ती करून राज्य विधीमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार वाढवून दिले व त्याचबरोबर दरवर्षी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने रचून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (D-P-S-I-R Guidelines) महानगरपालिकेला दरवर्षी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार करावा लागतो. (D-P-S-I-R: शहर वाढीला चालना देणारे घटक, ताण, सद्य स्थिती, परिणाम, प्रतिसाद)
पर्यावरण अहवाल तयार करताना अहवालाची गरज अभिप्रेत असणे, अहवालात तर्कसंगती असणे, परिस्थितीचे योग्य तऱ्हेने व कठोर शिस्तीने मूल्यमापन करणे, लोक-सहभाग असणे, पर्यावरणीय घटकांचा भौगोलिक अभ्यास करणे, संख्यात्मक विश्लेषण (पर्यावरण कार्यप्रवणता निर्देशांक) अचूक असणे यांसाठी झटावे लागते. पर्यावरण अहवालातून येणारा सावधानतेचा इशारा सर्वात महत्त्वाचा. शहरीकरणात जास्तीत जास्त प्रमाणात पर्यावरण घुसखोरी होत असते; तेव्हा रम्य रूपदर्शन न घडवता कुठे आणि किती सावधानता बाळगली पाहिजे याचे संकेत अहवालाने खरेतर दिले पाहिजेत.

एक पर्यावरण

सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे की पर्यावरण हे संपूर्ण पृथ्वीसाठी एकआहे. पुण्याचे पर्यावरण आणि सोलापूरचे पर्यावरण वेगळे आणि न्यूयॉर्क चे पर्यावरण वेगळे असे नसते. हवामान आणि वातावरण या गोष्टी भौगोलिक स्थितीप्रमाणे बदलतात पण पर्यावरण हे पृथ्वीचे एकच असते.पर्यावरण सद्यस्थिती अहवालात शहराने पर्यावरणात कुठवर हस्तक्षेप केला आहे, त्यातून भौगोलिक, भूगर्भीय बदल घडले आहेत का, असतील तर ते कोणते, या हस्तक्षेपांची तीव्रता आणि आवाका किती यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. किंबहुना, निव्वळ स्थितीदर्शक नव्हे तर पर्यावरणीय स्थितीबाबतच्या सावधानतेचा अग्रदूतम्हणून या अहवालास असामान्य महत्त्व प्राप्त झाले पाहिजे. आपल्या रम्य पर्यावरणाची सुस्थिती वरील मुद्द्याला नजरेआड करून दाखविण्यात आली आहे हे मात्र आम्हाला मान्य नाही. सावधानता तर बाजूलाच, पण सत्य-परिस्थिती देखील हा अहवाल समोर आणीत नाही.

तुरळक लोक-सहभाग

पर्यावरण अहवाल तयार करताना विविध विभागातील हवेची गुणवत्ता,पाण्याची गुणवत्ता,भूजलाचे प्रमाण,उर्जावापर व जमीनवापर यांची सांगड घालणे आवश्यक असते. या घटकांचा शास्त्रोक्त अभ्यास करणे गरजेचे असते. शहराच्या वेगवेगळ्या भागात जेव्हा या घटकांचा खोलवर अभ्यास करावा लागतो, तेव्हा लोकांना सहभागी करून घ्यावे लागते. स्थानिक लोकांना आपल्या भागाबद्दल अचूक व पुरेशी माहिती असते, पण या स्थानिकांच्या ज्ञानाला काहीच महत्त्व दिले गेलेले नाही. वडगाव व हडपसर येथील हवा-पाण्याची गुणवत्ता निराळी असू शकते; ध्वनी-प्रदूषणाची पातळी बदलू शकते, याची जाणीव विभागाला नाही. स्थानिकांना सहभागी करून घेतले असते तर विभागनिहाय अचूक सद्यस्थिती मांडता आली असती. अहवाल केवळ औपचारिकता म्हणून बनवायचा असल्याने लोकांना सहभागी करण्याची तसदी विभागाने घेतलेली नाही आणि अपूर्ण माहिती अहवालामार्फत प्रस्तुत केली आहे.
वर्तमानपत्रांतील बातम्या सोडल्या तर आणखीन कोणतेही कष्ट पर्यावरण विभागाने घेतले नाहीत. शाळांमध्ये, अभ्यासकांमध्ये, शहरात इतर ठिकाणी अहवालाला प्रसिद्धी दिली गेली नाही, व त्यामुळे कार्याशाळांना अपुरा प्रतिसाद मिळाला. अशा अत्यल्प सहभागातून निर्माण केलेला हा अहवाल दुय्यम दर्जाचा वाटतो.

पर्यावरण कार्य प्रवणता निर्देशांक एक थोतांड

पर्यावरणाच्या संख्यात्मक विश्लेषणासाठी पर्यावरण कार्यप्रवणता निर्देशांक’ (Environmental Performance Index) काढण्यात आला. विविध घटकांना परिस्थितीप्रमाणे गुण देऊन हा निर्देशांक काढण्यात आला. पण या निर्देशांकाचे संख्यात्मक विश्लेषण अहवालात केलेले नाही. पाणी टंचाईच्या झळा सोसलेले पुणे शहर, स्वाईन फ्लू ला शरण गेलेले पुणे शहर, घराबाहेर कचऱ्याचे साम्राज्य उभे करत आतमध्ये स्वच्छ असलेले पुणे शहर, महाराष्ट्रात उच्चांकी वाहने असलेले पुणे शहर, सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडालेले पुणे शहर या पार्श्वभूमीवर पुणे शहराला ५०० गुण मिळणे देखील अवघड असताना अहवालात पुण्याचे सुंदर चित्र रेखाटून ९६० पैकी ७०५ गुण देऊन महानगरपालिकेने जनतेला व स्वतःला फसविले आहे.

भूजल वास्तवापासून पळ?

भूजलासारख्या धगधगत्या विषयाला पर्यावरण विभागाने संसाधन म्हणून महत्त्व दिलेलेच नाही. भूजलाची पातळी किती आहे, ती खालावते आहे की नाही, कोण-कोणत्या भागात खालावते आहे, आणि किती खालावली आहे याबाबत कुठेच साधा उल्लेख सुद्धा नाही. २००९ मध्ये राज्याने दुष्काळ सोसला, २०११ मध्ये उत्तम पाउस होऊन सुद्धा २०१२ च्या उन्हाळ्यात लोकांचा आणि गुरांचा खाण्या-पिण्याचा प्रश्न चटके देऊन गेला. यासगळ्याचा भूजल पातळीवर होणारा दुष्परिणाम किती खोलवर गेला आहे याबाबात अहवाल भाष्य करीत नाही. शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट झाली. कित्येक वेळा बऱ्याच भागांमध्ये लोकांना तहान भागवता आली नाही. हवामान बदल मूलभूत असूनही पर्यावरण अहवालात त्यांना स्थान नाही. यावरून सिद्ध होते की महानगरपालिकेसाठी पर्यावरण हा दुर्लक्षलेला आणि नाईलाजाने लक्षात घेतला जाणारा विषय आहे.

प्राथमिक माहितीचा अभाव

पर्यावरण अहवाल तयार करताना सर्व ठिकाणी प्राथमिक माहिती (स्वतः निरीक्षणे घेऊन केलेले माहितीचे संकलन) उपलब्ध केली पाहिजे, ज्याने माहितीची विश्वासार्हता जपली जाते. बऱ्याच ठिकाणी पर्यावरण विभाग secondary data वर अवलंबून राहिलेला दिसतो. जमिनीचा वापर कसा बदलत गेला यावर टिप्पणी करताना अहवाल १९८७ आणि २००५ च्या जमीन वापराची तुलना करतो. २०११-१२ मधील जमिनीच्या वापराची सद्यस्थिती २००५ च्या माहितीवर आधारित असणं ही पर्यावरण विभागासाठी शरमेची गोष्ट आहे. २००५ हा २०११-१२ च्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालासाठी भूतकाळ आहे हे पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांना उमगलेले नाही. जैवविविधतेची परिस्थिती देखील रानवाया खाजगी संस्थेने केलेल्या साल २००० मधील माहिती वापरून प्रस्तुत केली आहे. एक तर २०११ सालची माहिती नाही, वरून स्वत:हून संकलित केलेली नाही ह्या आधारे कुठल्या तोंडून पर्यावरण विभाग लोकांना सद्यस्थिती सांगत आहे?
काही ठळक मुद्द्यांवर तर महापालिकेच्या हिमतीला मानावे लागेल. सरासर खोटी कारणे देऊन,परिस्थिती नसताना खोटे मूल्यांक देऊ करून पर्यावरण कार्यप्रवणता निर्देशांक वाढवलेला आहे.

पाणी पुरवठा

निर्देशांकात पाणी पुरवठ्याचा मुल्यांक सांगतो की पुण्यात १०% हून कमी पाणी वाया जाते. अलीकडेच केलेल्या शहराच्या पाणी पुरवठा सर्वेक्षणात एका खाजगी संस्थेने (के.एस. सोमय्या कॉलेज) पाण्याचा अपव्यय किती भयानक थराला जाऊन पोहोचलाय ते दाखवले. पुण्यात ४०% पाणी वाया जाते (गळती, चोरी व अनियंत्रित स्टॅंडपोस्ट).

ध्वनी-प्रदूषण

२०११ मधील जनगणनेत हे उघड झाले की महाराष्ट्र राज्यात पुण्यातच सगळ्यात जास्त वाहने आहेत. ३५ लाख लोकांना (३१ लाख स्थानिक व ४-५ लाख फिरती लोकसंख्या) दळणवळणासाठी २३ लाख खाजगी वैयक्तिक वाहने शहर स्वतःमध्ये सामावून घेत आहे. शहरातील वाहने वाढली की ध्वनी-प्रदूषण त्याच पटीत वाढते अहवाल खुद्द म्हणतो की ध्वनी-प्रदूषणात सर्वात मोठा वाटा हा वाहनांचा आहे. तरीही ध्वनी-प्रदूषणाच्या मूल्यांकनात पर्यावरण विभागाने शहराचा उदो उदो केला आहे.

हवेचे प्रदूषण

२००९ च्या पावसाळी दमट वातावरणात स्वाईन फ्लू चे आगमन झाले आणि तो लागलीच फोफावला. जलदगतीने पसरून भारतात दिल्ली व पुणे शहरांना त्याने सर्वात जास्त हादरून टाकले. दिल्लीत १४९ आणि पुण्यात १२५ जण दगावले. स्वाईन फ्लूचा राज्यांमध्ये महाराष्ट्रात, आणि त्यात पुण्यात सर्वात जास्त प्रादुर्भाव झाला. २०१२ मध्ये देखील उच्चांकी रुग्ण हे पुण्यात सापडले आहेत. रोगाची लागण होते ती हवेतील विषाणूंमुळे, आणि खालावलेल्या प्रतिकारशक्तीमुळे जी हवेच्या गुणवत्तेबरोबर घटते. याला काहीच सुद्धा महत्त्व न देऊन पर्यावरण विभागाने कच खाल्ली आहे.
शहरातील सर्वच्या सर्व (१००%) मैलापाणी शुद्धीकरण हे लवकरात लवकर झालेच पाहिजे. मैलापाणी नदीत सोडल्यामुळे नदीचे रूपांतर घाणेरड्या नाल्यामध्ये झाले आहे.पुणे जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांना व खासकरून सोलापूर जिल्ह्याला याची प्रत्यक्ष झळ बसते आहे. यामुळे नदीच्या आजूबाजूचे वातावरण खराब होते व दुर्गंधी पसरते. या सर्व गोष्टींची गंभीर दखल पर्यावरण अहवाल घेत नाही, पुणे शहरात कचरा निर्माण होतो तिथपासून विल्हेवाट लावेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ढासळलेली आहे. जिथे कचरा डंप केला जातो त्या गावाचा इस्कोट झालेला आहे. हवा आणि पाण्याचे भयंकर प्रमाणात प्रदूषण पुणे शहराने पाहिलेले आहे. त्यात सुमार कचरा व्यवस्थापनाने भर पडते आहे व सार्वजनिक आरोग्याचा बोजवारा उडाला आहे. याबाबत सावधानतेची घंटा वाजवणे सोडून सर्व काही आलबेल आहे असे रंगवले जात आहे.
पर्यावरण संवर्धन करताना विकासाला अडथळा येतो असे म्हणतात. विकास’दर’ कमी होऊ शकेल, पण संवर्धन केंद्रित विकास हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, दुरगामी विकास घडवतो. अशा विकासाचे ध्येय ठेवून आपण लोकांपासून पर्यावरणाची सत्य परिस्थिती लपवून ठेवत असलो, तर आपल्या शासनावर आणि प्रशासनावर प्रश्न निर्माण होईल – जो की आत्ता नक्कीच झाला आहे.

-    अभिषेक वाघमारे

Thursday 20 September 2012

देश घडवणाऱ्या शाळा !

आंतरराष्ट्रीय पातळीवरची पिसा चाचणी २००० मध्ये पहिल्यांदा घेतली गेली. या चाचणीत, व नंतरच्या २००३, २००६, २००९ मध्ये घेतल्या गेलेल्या चाचणीत फिनलॅंड या छोट्याश्या देशातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्तम यशाने जगाचे लक्ष वेधून घेतले. फिनलॅंडच्या विद्यार्थ्यांना उत्तम गुण तर मिळालेच, पण इतर देशांच्या तुलनेत या देशातील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादित केले. पिसाच्या तीन चाचण्या – वाचन, गणित व विज्ञान या तिन्ही चाचण्यांत बहुतांश फिनलॅंडच्या विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळाले. एवढेच नाही, तर या देशातील सर्व शाळांचे विद्यार्थी या चाचणीत तितकेच यशस्वी झाले. फिनलॅंडच्या सर्व शाळा शासनच चालवते हे कळल्यावर तर या यशाचे महत्व अधिकच अधोरेखित होते.
असे कसे झाले? फिनलॅंडच्या शाळांमध्ये नेमके काय घडत होते, ज्यामुळे फिन्नीश विद्यार्थी जगातील सर्व विद्यार्थ्यांच्या तुलनेत सरस ठरत होते? ते सुद्धा एकदा नव्हे, तर सातत्याने अनेक वेळा?
युरोपातील फिनलॅंडचे स्थान
या प्रश्नाने शिक्षण क्षेत्रातील जगातील शिक्षण तज्ञांना पिसाटून टाकले. आणि त्यानंतर फिनलॅंडच्या शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास सुरू झाला. आकडेवारी तपासली गेली, अनेक लेख, शोधनिबंध लिहीले गेले. फिनलॅंडच्या शाळांना, तिथल्या National Board of Education या शिक्षणाचे धोरण ठरवणार्‍या शासकीय संस्थेला अक्षरश: हजारो लोकांनी भेटी दिल्या. इतक्या, की फिनलॅंड देश हा शिक्षण क्षेत्रातील एक पर्यटन स्थळ बनला! फिनलॅंडच्या शासनाने तर चक्क आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल इतर देशांना माहिती देण्यासाठी एका दुताची नेमणूक केली व या दुताने एका दशकात सुमारे ५०,००० व्यक्तींशी संवाद साधत २५० भाषणे व १०० मुलाखती दिल्या!
या सर्व चर्विचरणातून फिन्नीश शिक्षण व्यवस्थेचे विविध पैलू समोर आले. आणि आज, जगातील अनेक शिक्षण तज्ञ व प्रशासक फिन्नीश शिक्षण व्यवस्थेने दिलेले हे धडे आत्मसात करत आहेत, गिरवायचा प्रयत्न करत आहेत.
संकट नको असले तरी बरेच काही शिकवून जाते, परत भे राहण्याची जिद्द देते. तसेच काहीसे फिनलॅंडचे झाले. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हा देश ५-६ वर्षे अत्यावस्थ होता. त्या काळी सुमारे ४० लाख लोकसंख्या असलेल्या या छोटेखानी, शेतीप्रधान अर्थसंस्कृती असलेल्या देशातल्या लाखो लोकांना युद्धाची झळ बसली. स्वातंत्र्यासाठी लढावे लागल्यामुळे फिन्नीश समाज एकत्र आला तो एक नवा आदर्शवाद घेऊनच. सर्वांसाठी समान शिक्षणाची संधी ही संकल्पना याच आदर्शांचा एक भाग होती. पुढचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असेल हे जाणून या समाजाने शिक्षणाचे महत्व ओळखले, व सामाजिक-आर्थिक विकास साधण्याचे एक महत्वाचे साधन म्हणून शिक्षणाला व शिक्षण क्षेत्राल प्राधान्य दिले.
त्या काळातली फिनलॅंडची शिक्षण व्यवस्था अनेक समस्यांनी ग्रस्त होती. कमी पटनोंदणी, प्राथमिक इयत्तेतच शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक, शहरी व श्रीमंत वर्गाला खासगी शाळांतून मिळणारी शिक्षणाची संधी व गरीब जनता मात्र वंचित, औपचारिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याला महत्व देणारी व शिक्षक-केंद्रित शिक्षण पद्धती, अशी आपल्याला ओळखीची व जवळची वाटेल अशीच तिथली शिक्षण व्यवस्था होती. १० पैकी ९ फिन्नीश नागरिक ७ ते ९ वर्षाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करु शकत होते.
या व्यवस्थेत आमुलाग्र बदल करायला हवा हे फिन्नीश शासनाने व नागरिकांनी ओळखले. १९४६ पासूनच फिन्नीश सरकारने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा पुरस्कार करण्यास सुरूवात केली. तेव्हा अस्तित्वात असलेल्या शैक्षणिक रचनेचा मूळ पायाच बदलण्याच्या दृष्टीने विचारांची पाले पडायला लागली. हे करताना फिन्नीश जनतेने व शासनाने प्रचंड खल केला; तीन महत्वाच्या समित्यांनी अभ्यास करून आपल्या शिफारसी मांडल्या, ज्यावर चर्चांचे झोड उठले. विरोधी मते मांडली गेली, टिकेला प्रत्युत्तर दिले गेले. या सर्व प्रक्रियेत, या चर्चेत केवळ राजकीय नेत्यांनीच नव्हे, तर पालकांपासून शिक्षण तज्ञांनी, शिक्षण क्षेत्रात संशोधन करणार्‍यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी भाग घेतला, आपली मते मांडली.
ही प्रक्रिया साधारणत: दोन दशकांच्या वर चालली. हळूहळू, काही मुद्दे स्वीकारत, काही नाकारत, प्रत्यक्षात आजची शिक्षण रचना साकारायला फिनलॅंडला १९७० चे साल उजाडले. एवढा काळ जरी लागला असला तरी ही प्रक्रिया चालू असतानाच त्याचे परिणाम दिसू लागले होते – १९५५-५६ मध्ये ३४,००० असलेली पटनोंदणी ५ वर्षात २ लाखांवर गेली होती, तर १९७० पर्यंत ३.२५ लाख पर्यंत पोचत दसपटीने वाढली.
आजच्या या फिन्नीश शिक्षण व्यवस्थेबद्दल बरेच काही लिहीता येईल. पण अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर या व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये पाहता येतील. फिन्नीश शिक्षण व्यवस्थेचा पाया हा तिची मुल्ये, रचना व शिक्षक प्रशिक्षण या तीन महत्वाच्या बाबींवर रचला गेला आहे असे म्हणता येईल.
या नवीन रचनेची जी काही मूल्ये ठरवली गेली, ती अशी -
·         सर्वांना शिक्षणाची समान संधी देणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानले गेले.
·         भक्कम अभ्यास व संशोधनावर आधारितच धोरण ठरवण्याचे सूत्र अंगीकारायचे असे ठरवण्यात आले.
·         शैक्षणिक धोरणामध्ये शैक्षणिक उद्दिष्टे ठरवणे, शिक्षण प्रक्रियेला महत्व देणे व सातत्यपूर्ण मूल्यमापन करणे या तिन्ही बाबींचा अंतर्भाव हवा हे निश्चित केले.
·         प्रत्येक विद्यार्थी महत्वाचा. अभ्यासक्रम पूर्ण करणे नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे शैक्षणिक व्यवस्थेचे लक्ष्य असावे हे ठरवले.
·         शिक्षक प्रशिक्षणाला अनन्यसाधारण महत्व हवे व त्याकडे एक स्पर्धात्मक व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन विकसीत करायला हवा हे मान्य केले गेले.
या व्यवस्थेत पहिली ९ वर्षे ही सर्वांना समान, मोफत व सक्तीचे शिक्षण दिले जाते. मुलांचे शाळेत यायचे वय हे ७ वर्ष आहे. ६ वर्षाचे मूल फारतर एक वर्ष पाळणाघरात जाईल, पण शाळेत ७ वर्षाचे झाल्यावरच जाऊ शकते. १०व्या वर्षी चाचणी घेतली जाते व विद्यार्थ्याची आवड व क्षमतेनुसार त्याला पुढचे शिक्षण घ्यायची मुभा दिली जाते. व्यवसाय प्रशिक्षणास खूप महत्व दिले जाते व ज्यांना अभ्यास व संशोधनात रस आहे अशांनाच पुढच्या डिग्री अभ्यासक्रमाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
शिक्षक प्रशिक्षण व संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांना असलेले अनन्यसाधारण महत्व हे फिन्नीश शिक्षण व्यवस्थेचे सर्वात मोठे वैषिष्ट्य म्हणावे लागेल. या बाबतीत फिनलॅंड जगातील इतर सर्व देशांच्या तुलनेत वेगळा विचार करताना दिसते. शिक्षकांवर टाकण्यात येणारा विश्वास, त्यांना दिले जाणारे स्वातंत्र्य व पर्यवेक्षणाचा अभाव हे बरेच काही सांगून जाते. फिन्नीश शाळा शासन चालवत असूनही या शाळांमध्ये पर्यवेक्षण होत नाही ही पटण्यासारखी गोष्ट नाही. पण हेच खरे आहे. असे असून सुद्धा फिनलॅंडच्या सर्व शाळांचे विद्यार्थी तेवढेच प्राविण्य मिळवतात याचे आश्चर्य वाटावे.
शिक्षक बनण्यासाठी बरेच फिन्नीश नागरिक उत्सुक असतात, तरीही दहा पैकी एकच व्यक्ती शिक्षक बनू शकतो. शिक्षक प्रशिक्षण विद्यापिठात प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा असते. म्हणूनच शिक्षक असणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. इथे महिलांचे प्रमाण अधिक आहे हे सांगायला नकोच. देशातले हुशार नागरिक या क्षेत्राकडे वळतात या वरुनच तिथली शिक्षण व्यवस्था कशी आहे याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. आपल्यालाही फिनलॅंडचे उदाहरण अनेक धडे देते.
आज फिनलॅंड हा जगातील एक प्रगत देश मानला जातो. याची पाळेमुळे ही या देशाच्या शिक्षण क्षेत्रात दडली आहेत हे फिन्नीश नागरिकाला पक्के ठाऊक आहे, नव्हे, हे जगानेही मान्य केले आहे.
भारतात मात्र शिक्षणाची समान संधी केंद्र शासनाने कायद्याने जरी देऊ केली असली तरी शासन स्वत: सर्व नागरिकांना शिक्षण देऊ शकत नाही असे म्हणत खासगी क्षेत्राला ही जबाबदारी पेलण्यासाठी आमंत्रण देत आहे. शासन उत्तम शिक्षण देऊ शकते हे फिनलॅंडचे उदाहरण आपल्याला सांगते. शासन व्यवस्थेमार्फत सर्वांपर्यंत शिक्षण पोचवण्याचे फायदे काय असतात हे फिनलॅंड आपल्याला दाखवून देतं. शिक्षण व्यवस्थेतले शिक्षकांचे स्थान किती महत्वाचे आहे हे आपल्याला फिनलॅंडचे उदाहरण समजल्यावर कळते. शिक्षक घडवण्याचे काम कसे करावे हे याच देशाकडून आपण शिकावे हे नक्की.


- विनिता ताटके
सदस्य,
शिक्षण मंडळ, पुणे महानगरपालिका.