Friday, 2 November 2012

पैशाची गोष्ट


गेल्या काही वर्षात जगात, विशेषतः पाश्चिमात्य देशात निर्माण झालेल्या आर्थिक प्रश्नांमुळे, अनेक देशांच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थांमुळे जगभरचे अर्थतज्ञ या विषयात आपले डोके घालून यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत.

भारतातही नुकतेच काही महत्वपूर्ण निर्णय घेत सरकारने आर्थिक सुधारणांची घोषणा केली. त्यावर विरोध-पाठींबा असे खेळ चालू आहेतच. यासगळ्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिक म्हणून नेमका पैसा निर्माण कसा होतो आणि त्यासंदर्भातले भीषण प्रश्न उभे कसे राहतात हे आपण माहित करून घ्यायला हवं.
पण अर्थशास्त्र हा किती किचकट आणि कंटाळवाणा वाटणारा विषय! अशा विषयात रस कसा वाटणार?!

कदाचित याच विचारांनी ‘इडो झैफमन’ नावाच्या व्यक्तीने एक अवघ्या ४ मिनिटांचा माहितीपट बनवला आहे, ज्याचे नाव आहे “द मेकिंग ऑफ मनी” म्हणजेच पैशाच्या निर्मितीची गोष्ट! (‘मनी मेकिंग’ची म्हणजे पैसा कमावण्याची गोष्ट नव्हे!). “द मेकिंग ऑफ मनी” असं नाव देत दिग्दर्शकाने सुरुवातीलाच सुंदर श्लेष साधला आहे.
ही आहे पैशाची गोष्ट! इतिहासपूर्व काळातील वस्तूंची देवाण घेवाण असलेली बार्टर पद्धत ते सोन्याच्या बदल्यात मिळणारा कागदी पैसा, आणि आता सोन्याशिवायच निर्माण होत जाणारा पैसा अशी रंजक मांडणी करत हा माहितीपट पुढे सरकतो. पैसा कसा निर्माण होतो हे सांगतानाच आता या पैशामुळे नेमका प्रश्न कसा निर्माण झाला आहे हेही आपल्यासमोर येते.


आणि अखेर यावर काहीतरी ठोस उपाय करायला हवा आहे हे सांगतानाच कोणत्याही बदलाची सुरुवात स्वतःपासून होते या महात्मा गांधींच्या वाक्याची आठवण करून देत माहितीपट संपतो.

एनिमेशनचा सुंदर वापर, थोडक्यात पण नेमकी माहिती आणि अवघी ४ मिनिटांची लांबी या शॉर्टफिल्मच्या जमेच्या बाजू!

नक्की पहा- “द मेकिंग ऑफ मनी” http://www.filmsforaction.org/Watch/The_making_of_money/


-    तन्मय कानिटकर


No comments:

Post a Comment