Monday 21 January 2013

द टॅंक मॅन

गोष्ट आहे चीन मधली. गोष्ट आहे चीन मधल्या हुकूमशाही विरोधी लढ्याची. गोष्ट आहे एका अज्ञात नायकाची ज्याने २३ वर्षांपूर्वी अख्या जगाचं लक्ष चीन मध्ये सुरु असलेल्या जाचक घटनांकडे वेधून घेतलं.

एवढसं काही केलं की लगेच ते सगळ्यांना सांगून पाठीवर थाप मिळवण्यासाठी आपल्या सगळ्यांची गडबड सुरु असते. कुठेतरी एखादी मेणबत्ती लावली किंवा कुठे ‘...की जय’ किंवा टोपी घालून ‘...आगे बढो हम तुम्हारे साथ है!’ म्हणत भटकलो की कधी एकदा त्याचा फोटो काढून फेसबुकावर टाकतो आणि त्याचे किती लाईक घेतो असं आपल्याला झालं असतं. पण या चीन मधल्या गोष्टीला २४ वर्ष पूर्ण होत आली तरीही या विद्रोहीचं नाव कोणालाही ठाऊक नाही.

ही घटना घडली ५ जून १९८९ या दिवशी चीन मधल्या तीयांमेन चौकात. हा चौक म्हणजे चीनची राजधानी बीजिंग मधला एक मुख्य चौक. आकारानी भला मोठ्ठा १०९ एकराचा. या चौकात जुलै १९८९ आधी दोन महिने विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरु केली होती. चीनमध्ये असलेल्या जाचक कायद्यांमुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करायला लागत होता. अत्यंत कडक कायदे त्याच्या कडक शिक्षा यामुळे माणसाचं मुलभूत स्वातंत्र्य हिरावलं जातं आहे, हे कायदे बदलेले जावेत असं त्या विध्यार्थ्यांना वाटत होतं. चीन मध्ये वृत्तपत्रांना अधिक स्वातंत्र्य दिलं जावं, महाविद्यालयीन शिक्षणपद्धती बदलली जावी, सरकारने रोजगाराचा विचार करावा, कामगारांचे हक्क जपले जावेत, प्रशासन अधिक लोकाभिमुख असावं अशा आणि अशांच प्रकारच्या मागण्या घेऊन या विद्यार्थी संघटना चीनच्या या चौकात जमा झाल्या होत्या.

एक दोन दिवसासाठी जामा नव्हते झाले हे विद्यार्थी, तर ते जवळ-जवळ १० हजार या चौकात काही आठवड्यापासून ठिय्या देऊन बसले होते. चीनी सरकार हे ठिय्या आंदोलन मोडीत काढायच्या बेतात होते. त्यासाठी लष्कराचे ३ लाख जवान तैनात करण्यात आले होते. जसं जसं हे विद्यार्थी आंदोलन पेटत गेलं तशी तशी तिथल्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढायला लागली. जून महिन्यात त्यांची संख्या २.५ लाखांपर्यंत गेली होती. या मोठ्या समुदायाचा ‘बंदोबस्त’ करण्यासाठी जवानांबरोबरचं सैन्यातले अनेक रणगाडेही बीजिंगमध्ये आणण्यात आले होते. ४ जूनला या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं होतं. यामध्ये अनेक सैनिक आणि अनेक विद्यार्थीही मृत्युमुखी पडले होते. (चीनच्या सरकारने अजूनही मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही पण तो काही शे असावा अशी शक्यता आहे).

या हिंसक आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ जून १९८९ रोजी जेव्हा आंदोलन काहीसं शांत, सुन्न झालं होतं. रस्त्यावर आदल्या दिवशी झालेल्या हिंसाचारात जळलेल्या बस गाड्या अजून तशाच होत्या. तेव्हा सर्व परिस्थिती काबुमध्ये आहे ना, हे तपासण्यासाठी रणगाडे त्या चौकात गस्त घालत होते. आणि हे लष्कराचं शक्तिप्रदर्शन सारे विद्यार्थी आंदोलक आणि जनता बघत होती.

इतक्यात कोणाचं लक्ष नसताना एक कृश, काळी पॅंट पंधरा शर्ट घातलेला, दोन्ही हातात भाजीच्या पिशव्या घेतलेला एक तरुण एकदम त्या रणगाड्यांच्या ताफ्यासमोर उभा ठाकला. त्याला चुकवण्यासाठी दिशा बदलली की तो तिथे जायचा. आपल्या हातातल्या भाजीच्या पिशव्या सांभाळत त्या प्रचंड मोठ्या रणगाड्याला रोखण्यासाठी. हे झाल्यावर तरी तो रणगाडा मागे हाटत नाही म्हणून हातातल्या एका पिशवीने तो रणगाड्याला शू ... शू... करून हाकलवून लावायचा प्रयत्न करत होता. तरीही तो जाईना. मग तो इसम सरळ त्या रणगाड्यावर चढून त्या चालकाची बोलताना दिसला. त्यानंतर मात्र दोन आंदोलक येऊन त्याला तिथून घेऊन गेले.

या घटनेनंतर बीजिंगमध्ये मार्शल लॉ जाहीर करण्यात आला. पण त्या रणगाडा थांबवणार्‍या माणसाचं काय झालं, माहीत नाही. काही म्हणतात की तो नंतर झालेल्या हिंसाचारात मारला गेला, काही म्हणतात की त्याला गायब करण्यात आलं. पण या अज्ञात विद्रोह्याने जगाचं लक्ष या आंदोलनाकडे वळवलं. अजही हा टॅंक-मॅन जगातल्या सर्वचं अहिंसक आंदोलकांना  प्रेरणा देतो आहे.
- प्रज्ञा शिदोरे  
(दि १८ जानेवारी २०१२ रोजी दै. लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणी मध्ये प्रसिद्ध http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-17-01-2013-6ba6b&ndate=2013-01-18&editionname=oxygen)

No comments:

Post a Comment