Monday 14 January 2013

ऑक्युपाय मेन्स टॉयलेट


पुरुष, मुलगे वाट्टेल तेव्हा रस्त्यावरच्या सार्वजनिक मुतारीत जाऊन आपले काम उरकतात आणि बायका-मुलींनाच मात्र वाट बघत, कळ सोसत थांबावे लागते, असे का?
- असा प्रश्न पडून आधी वैतागलेली ली मैझी ही चिनी तरुणी. नंतर भडकली.
पण नुसते भडकून काय होणार?
तिनं ठरवलं, काहीतरी करू.
पण काय?

तिने आपल्या मैत्रिणी गोळा केल्या. त्यांनी मिळून रात्रभर जागून गुलाबी रंगात पोस्टर्स रंगवली आणि १८ फेब्रुवारी २0१२ या दिवशी सकाळी गॉन्गझाउ या चिनी शहरात पुरुषांसाठी राखीव असलेल्या मुतारीसमोर रांग लावली. त्यांच्या हातातल्या पोस्टर्सवर लिहिले होते, ‘स्त्रियांवर प्रेम आहे ना तुमचे? - मग त्यांनाही बाथरूमला जाऊ द्या.

बायकांपेक्षा पुरुषांसाठी आधीच सार्वजनिक स्वच्छतागृहे जास्त. त्यातून एका ब्लॉकमध्ये जास्तीची युरीनल्स (मुतारी) बसवता येत असल्यानं त्यांचं काम पटकन होतं, मुलींना मात्र फार काळ ताटकळावं लागतं असा लीचा अनुभव होता. म्हणजे पुरुषांसाठीच्या मुतार्‍या रिकाम्या आणि बायका बाहेर ताटकळत उभ्या. असं का? असा प्रश्न विचारून ती थांबली नाही.
तर जोवर प्रशासन बायकांसाठी पुरेशी व्यवस्था करत नाही, तोवर त्या पुरुषांसाठीच्या मुतार्‍या वापरतील, असं तिनंच ठरवलं आणि आपल्या मैत्रिणींना पटवलं.
बघताबघता ही बातमी फुटली आणि चीनसकट सगळ्या जगभरात पसरली. मीडियानं तिच्या या आंदोलनाला नाव दिलं- ऑक्युपाय मेन्स टॉयलेट.
अखेरीस चीनचं प्रशासन खडबडून जागं झालं आणि स्त्रियांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या दुप्पट करण्याचं ठरलं.

मी काही हिरो नाही; पण घराबाहेर पडल्यावर माझ्या देशात मला बाथरूमला जाता येत नाही म्हणून माझी किडनी खराब करून घ्यायला मी नकार देते आहे, एवढंच.’- ली नं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

या यशस्वी आंदोलनानंतर तिला बीजिंगमधल्या राष्ट्रीय परिषदेचं बोलावणं आलं.
तर तिथे जाऊन ती चीनच्या राष्ट्रप्रमुखांना म्हणाली,
स्त्रियांवर प्रेम करता ना तुम्ही?- मग त्यांना बाथरूमला जाऊ द्या.

- प्रज्ञा शिदोरे

(दि. ११ जानेवारी २०११ च्या दै. लोकमत मध्ये प्रसिद्ध. http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-11-01-2013-34072&ndate=2013-01-11&editionname=oxygen)

No comments:

Post a Comment