Friday, 6 April 2012

इंटरनेट मूव्ही डाटाबेस

सिनेमे बघायला सर्वांनाच आवडतं! सिनेमा बघून झाला की सिनेमाच्या अनेक पैलूंवर मग उलटसुलट चर्चा करणं ओघानीच आलं. सिनेमातील कलाकारांच्या त्यांच्या इतर कामांशी तुलना करणं, कोणाला किती प्रसिद्धी मिळाली आहे, बॉक्स ऑफिसमधे कोणी किती गल्ला जमावाला, अशा चर्चा आपण तासनतास करतो. अशाच चर्चा करण्यासाठी, त्या कलाकृती विषयी अजून माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट मूव्ही डाटाबेस हे संकेतस्थळ आपल्याला उपलब्ध आहे.
इंटरनेट मूव्ही डाटाबेस हे संकेतस्थळ कोल नीडमन नावाच्या सिने रसिकाने १९९० मधे सुरु केले. चित्रपट रसिकांना त्यांच्या आवडत्या कलाकृतींविषयी माहिती पुरविणे, जगात प्रकाशित झालेले सर्व चित्रपटांची अधिक माहिती सकट एक समग्र यादी बनविणे आणि चित्रपटांचे उत्तम रसग्रहण करता येणे हा यामागचा हेतू होता. आज हे संकेतस्थळ जगभरातील चित्रपट रसिकांना माहिती पुरवणारा सर्वात मोठा साठा बनले आहे.
इथे तुम्ही तुम्ही बघितलेल्या सिनेमांची त्यांच्या प्रकारानुसार यादी करू शकता. या याद्या वाचून तुम्हाला कोणता चित्रपट बघायला आवडेल अश्या सिनेमांची नावे हे संकेतस्थळ तुम्हाला सुचवते. त्याच बरोबर सिनेमांवर चर्चा, ऑस्कर मिळविलेल्या चित्रपटांची यादी, जगातील सर्वोत्तम २५० चित्रपटांची माहिती या व अशा अनेक गमती या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
हिंदी, इंग्रजी, रशियन, फ्रेंच, जर्मन, झेक, अशा अनेक भाषेतील चित्रपटांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आणि आपली चित्रपटांबद्दल रुची वाढविण्यासाठी इंटरनेट मूव्ही डाटाबेसला नक्की भेट द्या!
-प्रज्ञा शिदोरे

(६ एप्रिल २०१२ रोजी लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रकाशित.)

No comments:

Post a Comment