Friday, 13 April 2012

एका मिनिटात!

जगातला सर्वात हुशार माणूस असं ज्याच्याबाबत म्हणलं जातं तो अल्बर्ट आईनस्टाईन म्हणायचा की, ‘सोप्या भाषेत तुम्हाला एखादी गोष्ट सांगता आली नाही तर तुम्हाला ती नीट समजलीच नाही..!’
कदाचित हेच आव्हान स्वीकारत हेनरी राईश या माणसाने एक मिनिटात फिजिक्स मधल्या, म्हणजेच भौतिकशास्त्रातल्या, अवघड संकल्पना सोप्या भाषेत मांडायचे आव्हान स्वीकारले. आणि त्यासाठी त्याने ‘यूटयूब’ या व्हिडीओज बघायच्या वेबसाईटचा आधार घेतला.
जून २०११ मध्ये हेनरीने पहिल्यांदा ‘गुरुत्वाकर्षण म्हणजे काय’ हे सांगणारा एक मिनिटाचा एक व्हिडीओ यूटयूबच्या आपल्या चैनेल वरती अपलोड केला. आणि मग दर आठवड्याला त्याने एक व्हिडीओ करायला सुरुवात केली. गुरुत्वाकर्षण, सापेक्षतावाद, प्रकाशाचा वेग असे असंख्य विषय त्याने या व्हिडीओज मध्ये मांडले. बघता बघता अगदी लहान मुलांपासून ते प्रोफेसर मंडळींपर्यंत असंख्य लोक याचा फायदा घेऊ लागले!
एक ते जास्तीत जास्त दीड मिनिटाच्या या व्हिडीओजची खासियत म्हणजे हे अतिशय सोप्या भाषेत तर आहेतच पण त्याचबरोबर त्यातल्या चित्रांमुळे ते गंमतीदारसुद्धा आहेत...
आज ‘मिनिट फिजिक्स’ या हेनरीच्या यूट्यूब चैनेलवर ४५ पेक्षा जास्त व्हिडीओज आहेत आणि किमान अडीच लाख लोकांनी या चैनेलवर नोंदणी(subscribe) केली आहे. इतकेच नव्हे तर हे व्हिडीओज तब्बल १ कोटी ८६ लाख वेळा बघितले गेले आहेत. आणि या संख्या दर आठवड्याला वाढतच आहेत!
नक्की पहा- http://www.youtube.com/minutephysics

-    तन्मय कानिटकर
(१३ एप्रिल रोजी दै.लोकमत च्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रकाशित. http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=OxygenEdition-57-1-12-04-2012-d353d&ndate=2012-04-13&editionname=ओक्ष्य्गेन)

No comments:

Post a Comment