Monday, 25 February 2013

एक हंडा, एक रुपया.. आणि निषेध


ही गोष्ट आहे आपल्यापासून अगदी जवळची... चीन नाही, दक्षिण अमेरिका नाही, इजिप्त नाही. तर आपल्या महाराष्ट्रातली. पुण्यातली.
परवाच्या २६ जानेवारीला या घटनेला ९ वर्ष पूर्ण झाली. यानिमिताने ‘ती’ची पुन्हा एकदा आठवण झाली.

गोष्ट आहे ९ वर्षांपूर्वीची. विषय होता ‘जेम्स लेन’चा. कदाचित तुम्हाला आठवत असेल आपण कॉलेजमध्ये असताना हे प्रकरण भलतंच गाजलं होतं.  जेम्स लेनने त्याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल काही विधानं केली होती. लेनला हे पुस्तक लिहिल्यासाठी मदत झाली होती ती पुण्यामधल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळाची. (Bhandarkar oriental research institute किंवा BORI). ही विधानं नवीनच स्थापन झालेल्या ‘संभाजी ब्रिगेड’ला आक्षेपार्ह आणि ‘भावना दुखावणारी’ वाटली. म्हणून लेनच्या या पुस्तकावर बहिष्कार घालावा अशी त्यांची मागणी होती. आपली मागणी जोरकसपणे मांडण्यासाठी त्यांनी याच भांडार इन्स्टिट्यूट वर हल्ला चढवला होता.
ह्या हल्ल्यात त्या वास्तूचं प्रचंड नुकसान तर झालच, पण तिथे अभ्यासासाठी जतन केलेली ऐतिहासिक महत्वाच्या कागदपत्रांची नासधूस झाली. आमच्या कॉलेजमध्ये इतिहास शिकवणारे आमचे प्राध्यापक, संस्कृत विभागातले आमचे काही शिक्षक आणि सीनियर्स भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये झालेली ही नासधूस आवरायला पुढचे अनेक दिवस तिथे जाऊन मदत करत होते. ही घटना घडली ६ जानेवारीला. त्यानंतर साधारण एका आठवड्यानी मला एक ई-मेल आली. तेव्हा खरंतर ई-मेल अकाऊंट असणं ते नीट वापरणं हे फारसं माहित नव्हतं. त्यामुळे अशी नावानं मेल आल्यामुळे जाम भारी वाटलं होतं.

त्या पत्राचा आशय साधारण असा होता..
“प्रिय प्रज्ञा,
भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये काय झालं हे तुला माहीतच असेल. जेम्स लेनची विधानं चुकीची असतीलही. पण, त्याचा या प्रकारे निषेध करणं चुकीचं आहे. महत्वाच्या कागदपत्रांची नासाडी करून, पुस्तकावर बंदी घालून म्हणणं खरं करता येत नाही. जे झालं ते व्हायला नको होतं असं तुला वाटत असेल तर त्याचा समोर येऊन निषेध करायला तू तयार आहेस का?
तुझं उत्तर ‘हो’ असेल तर २६ जानेवारीला सकाळी झेंडावंदनाला तू भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये ये. हातात फक्त एक रुपयाचं नाणं घेऊन. राष्ट्रगीत झालं की तिथे असलेल्या एका मातीच्या भांड्यात तू तुझा रुपया टाक. आवाज नको, आरडाओरडा नको. १ रुपया टाकून तू तुझा निषेध नोंदव. (तुझा एक रुपया या इमारतीच्या डागडुजीसाठी वापरण्यात येईल)
-एक स्वतंत्र भारताचा नागरिक”

काहीच कळेना. स्वतंत्र भारताचा नागरिक?? दुसऱ्या दिवशी हा प्रकार कॉलेजमध्ये सांगायला गेले तेव्हा अनेकांना अशाच आशयाची मेल आल्याचं कळलं. इमेल आयडी सुद्धा विचित्रच. लेखक निनावी. कल्पना आवडल्यामुळे आम्हीही ही मेल अनेकांना पाठवली आणि २६ जानेवारीला भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये सकाळी हजर झालो. वाटलं कोणीतरी पुढे येईल सांगायला की हे पत्र पाठवलं कोणी ते सांगायला... कुठचं काय!?
राष्ट्रगीत झालं. तिथे “मी इथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो”असं लिहिलेला एक हंडा होता.. कोणी ठेवला माहित नाही. ही मेल बहुतेक पोलिसांनाही पोचली होती. त्यामुळे पोलीसही या हंड्याकडे कुतुहलानी बघत होते. बघता बघता बरीच मंडळी जमली होती. कोणालाच माहित नाही की यामागे कोण आहे! त्यामुळे परस्परांना विरोध करणारे लोकही एकत्र हातात एक रुपयाचं नाणं घेऊन हजर होते!
शेवटी एका वयस्कर बाईंनी कोणीचं पटकन्‌ पुढे येत नाही हे बघून आपलं नाणं त्या हंड्यात टाकलं. मग तिथे नाणं टाकून आपला निषेध नोंदवायला मोठ्ठीच्यामोठ्ठी रंगच लागली! आम्हला शेवटपर्यंत कळलं नाही की ही मेल पाठवली कोणी? हा हंडा ठेवला कोणी? आम्ही जवळजवळ संध्याकाळ पर्यंत तिथे ठाण मांडून बसलो होतो. कुणीच आलं नाही.. मग काही जेष्ठ नागरिकांनी ह हंडा उघडायचं ठरवलं. तोपर्यंत आम्ही तिथून कंटाळून निघून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी एका ओळखीच्या आजोबांनी आम्हाला सांगितलं की तो हंडा त्यांनी उघडून त्यातली रक्कम भांडारकर इन्स्टिट्यूटच्या पुनर्बांधणीला मदत म्हणून देऊ केली होती. साधारण ६ हजारच्या वर रक्कम जमा झाली होती. आजोबांनी सांगितल्या प्रमाणे त्यात फक्त १ रू ची नाणीच नाही तर नोटाही होत्या. काही पत्र होती. हे सर्व त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटला देऊ केलं होतं.
कोणी श्रेय घेणारी व्यक्ती नाही, संस्था नाही, संघटना नाही. तरी, आणि कदाचित म्हणूनच असा रचनात्मक निषेध नोंदवण्यासाठी लोकं आपला वेळ, पैसा खर्च करून आले होते. म्हणूनच दर २६ जानेवारीला त्या मेलची आठवण होते. अजूनही या सगळ्या प्रकारामागे कोण आहे माहित नाही.

- प्रज्ञा शिदोरे
(दि. २२ फेब्रुवारी २०१३ रोजी दै. लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रकाशित. http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-22-02-2013-fb7bd&ndate=2013-02-22&editionname=oxygen)

1 comment: