Monday, 25 February 2013

एक हंडा, एक रुपया.. आणि निषेध


ही गोष्ट आहे आपल्यापासून अगदी जवळची... चीन नाही, दक्षिण अमेरिका नाही, इजिप्त नाही. तर आपल्या महाराष्ट्रातली. पुण्यातली.
परवाच्या २६ जानेवारीला या घटनेला ९ वर्ष पूर्ण झाली. यानिमिताने ‘ती’ची पुन्हा एकदा आठवण झाली.

गोष्ट आहे ९ वर्षांपूर्वीची. विषय होता ‘जेम्स लेन’चा. कदाचित तुम्हाला आठवत असेल आपण कॉलेजमध्ये असताना हे प्रकरण भलतंच गाजलं होतं.  जेम्स लेनने त्याच्या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल काही विधानं केली होती. लेनला हे पुस्तक लिहिल्यासाठी मदत झाली होती ती पुण्यामधल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळाची. (Bhandarkar oriental research institute किंवा BORI). ही विधानं नवीनच स्थापन झालेल्या ‘संभाजी ब्रिगेड’ला आक्षेपार्ह आणि ‘भावना दुखावणारी’ वाटली. म्हणून लेनच्या या पुस्तकावर बहिष्कार घालावा अशी त्यांची मागणी होती. आपली मागणी जोरकसपणे मांडण्यासाठी त्यांनी याच भांडार इन्स्टिट्यूट वर हल्ला चढवला होता.
ह्या हल्ल्यात त्या वास्तूचं प्रचंड नुकसान तर झालच, पण तिथे अभ्यासासाठी जतन केलेली ऐतिहासिक महत्वाच्या कागदपत्रांची नासधूस झाली. आमच्या कॉलेजमध्ये इतिहास शिकवणारे आमचे प्राध्यापक, संस्कृत विभागातले आमचे काही शिक्षक आणि सीनियर्स भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये झालेली ही नासधूस आवरायला पुढचे अनेक दिवस तिथे जाऊन मदत करत होते. ही घटना घडली ६ जानेवारीला. त्यानंतर साधारण एका आठवड्यानी मला एक ई-मेल आली. तेव्हा खरंतर ई-मेल अकाऊंट असणं ते नीट वापरणं हे फारसं माहित नव्हतं. त्यामुळे अशी नावानं मेल आल्यामुळे जाम भारी वाटलं होतं.

त्या पत्राचा आशय साधारण असा होता..
“प्रिय प्रज्ञा,
भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये काय झालं हे तुला माहीतच असेल. जेम्स लेनची विधानं चुकीची असतीलही. पण, त्याचा या प्रकारे निषेध करणं चुकीचं आहे. महत्वाच्या कागदपत्रांची नासाडी करून, पुस्तकावर बंदी घालून म्हणणं खरं करता येत नाही. जे झालं ते व्हायला नको होतं असं तुला वाटत असेल तर त्याचा समोर येऊन निषेध करायला तू तयार आहेस का?
तुझं उत्तर ‘हो’ असेल तर २६ जानेवारीला सकाळी झेंडावंदनाला तू भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये ये. हातात फक्त एक रुपयाचं नाणं घेऊन. राष्ट्रगीत झालं की तिथे असलेल्या एका मातीच्या भांड्यात तू तुझा रुपया टाक. आवाज नको, आरडाओरडा नको. १ रुपया टाकून तू तुझा निषेध नोंदव. (तुझा एक रुपया या इमारतीच्या डागडुजीसाठी वापरण्यात येईल)
-एक स्वतंत्र भारताचा नागरिक”

काहीच कळेना. स्वतंत्र भारताचा नागरिक?? दुसऱ्या दिवशी हा प्रकार कॉलेजमध्ये सांगायला गेले तेव्हा अनेकांना अशाच आशयाची मेल आल्याचं कळलं. इमेल आयडी सुद्धा विचित्रच. लेखक निनावी. कल्पना आवडल्यामुळे आम्हीही ही मेल अनेकांना पाठवली आणि २६ जानेवारीला भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये सकाळी हजर झालो. वाटलं कोणीतरी पुढे येईल सांगायला की हे पत्र पाठवलं कोणी ते सांगायला... कुठचं काय!?
राष्ट्रगीत झालं. तिथे “मी इथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो”असं लिहिलेला एक हंडा होता.. कोणी ठेवला माहित नाही. ही मेल बहुतेक पोलिसांनाही पोचली होती. त्यामुळे पोलीसही या हंड्याकडे कुतुहलानी बघत होते. बघता बघता बरीच मंडळी जमली होती. कोणालाच माहित नाही की यामागे कोण आहे! त्यामुळे परस्परांना विरोध करणारे लोकही एकत्र हातात एक रुपयाचं नाणं घेऊन हजर होते!
शेवटी एका वयस्कर बाईंनी कोणीचं पटकन्‌ पुढे येत नाही हे बघून आपलं नाणं त्या हंड्यात टाकलं. मग तिथे नाणं टाकून आपला निषेध नोंदवायला मोठ्ठीच्यामोठ्ठी रंगच लागली! आम्हला शेवटपर्यंत कळलं नाही की ही मेल पाठवली कोणी? हा हंडा ठेवला कोणी? आम्ही जवळजवळ संध्याकाळ पर्यंत तिथे ठाण मांडून बसलो होतो. कुणीच आलं नाही.. मग काही जेष्ठ नागरिकांनी ह हंडा उघडायचं ठरवलं. तोपर्यंत आम्ही तिथून कंटाळून निघून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी एका ओळखीच्या आजोबांनी आम्हाला सांगितलं की तो हंडा त्यांनी उघडून त्यातली रक्कम भांडारकर इन्स्टिट्यूटच्या पुनर्बांधणीला मदत म्हणून देऊ केली होती. साधारण ६ हजारच्या वर रक्कम जमा झाली होती. आजोबांनी सांगितल्या प्रमाणे त्यात फक्त १ रू ची नाणीच नाही तर नोटाही होत्या. काही पत्र होती. हे सर्व त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटला देऊ केलं होतं.
कोणी श्रेय घेणारी व्यक्ती नाही, संस्था नाही, संघटना नाही. तरी, आणि कदाचित म्हणूनच असा रचनात्मक निषेध नोंदवण्यासाठी लोकं आपला वेळ, पैसा खर्च करून आले होते. म्हणूनच दर २६ जानेवारीला त्या मेलची आठवण होते. अजूनही या सगळ्या प्रकारामागे कोण आहे माहित नाही.

- प्रज्ञा शिदोरे
(दि. २२ फेब्रुवारी २०१३ रोजी दै. लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रकाशित. http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-22-02-2013-fb7bd&ndate=2013-02-22&editionname=oxygen)

Wednesday, 20 February 2013

सियारा लियॉनचे हिरे


पश्चिम आफ्रिकेतल्या सियारा-लियॉन या देशामध्ये  निवडणुका शांततापूर्ण व्हाव्यात म्हणून प्रसंगी जीवावर बेतले तरी लोकशाही प्रक्रिया वाचवण्यासाठी धडपडणारे हे कोनो या गावातले तरुण...


सियारा लियॉन हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं?
एकतर, ‘ब्लड डायमंड’ या हॉलीवूडच्या चित्रपटातला, हिऱ्यांची तस्करी करणारा लिओनार्दो दिकॅप्रिओ. नाहीतर अनेक वर्ष सुरु असलेलं, अतिशय क्रूर असं सिव्हील वॉर. किंवा या युद्धानंतर तग न धरू शकणारी, कुपोषणामुळे, पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे, बेरोजगारीमुळे ग्रासलेली अत्यंत गरीब अशी पश्चिम अफ्रिकेतील जनता... बस्स...
कोनो हे सियारा लियॉनमधल्या अशांततेचं जणू केंद्रबिंदुच. गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर २०१२ मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका आयोजित करण्यात आल्या होत्या. या निवडणुकांच्या वेळी देशांत नव्हे तर जगात सर्वांना अशी खात्री होती की निवडणुकांमध्ये जर काही हिंसाचार झाला तर त्याची ठिकाणी या कोनो मधूनच पेटेल.
कोनोमध्ये बाकीच्या देशा प्रमाणेच बेकारी. इथे हिऱ्याच्या खाणी असूनही इथल्या स्थानिकांना कोणत्याही प्रकारचा रोजगार मिळत नाही. या वाढत्या बेकारीमुळे इथला तरुण चुकीच्या प्रलोभनांना बळी पडतो. आपलं सारं आयुष्य दारू, गर्द यापायी इथली १/३ जनता  वाया घालवते आहे. कोनोमध्ये आता परिस्थिती बदलते आहे, हळूहळू इथे ’लोकशाही प्रक्रीये’ला पालवी फुटायला सुरवात झाली आहे.
कोनोमधल्या या परिस्थितीमुळे इथे अनेक आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था काम करत असतात. अशाच एका ‘युकेएड’ नावाच्या ब्रिटीश संस्थेच्या मदतीने इथे कोनोमध्ये ‘माव्हानाची’ या तरुणांच्या संघटनेची सुरुवात झाली. ‘माव्हानाची’ हा स्वाहिली भाषेतला शब्द. याचा अर्थ सामान्य माणूस. हा शब्द सामान्य, कष्टाळू अशा पुरुष किंवा स्त्रीला उद्देशून वापरला जातो. इथल्या तरुण जनतेकडे इथला लोकप्रतिनिधी कधीही लक्ष देत नासायाचा. स्वत:च्या मतदार संघात तो सापडला तरी खूप झालं! गावातली परिस्थिती बदलण्याचं साधन हे लोकप्रतिनिधीच असू शकतात असं या संघटनेच्या लक्षात आलं. मग त्यांनी या राज्यकर्त्यांना गाठायला सुरवात केली. तुम्ही बोलला नाहीत तर आम्ही विरोधी पक्षाकडे जाऊ अशी धमकीही दिली. कोनो सारख्या भागात एखाद्या राज्यकर्त्याकडे बोलायला जाणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. काय माहित, त्याला जर राग आला आणि त्यांनी तुमचा काटा काढायचा ठरवलं तर ते त्याला सहज शक्य होतं. पण हे तरुण संघटीत असल्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या आव्हानांना सामोरं जायला बळ मिळालं.  आज हे तरुण आपल्या लोकप्रतिनिधींशी संपर्क साधू शकतात. आपली गाऱ्हाणी त्यांच्याकडे मांडू शकतात. कोनोमधली परिस्थिती सुधारण्यासाठी नागरिकांना एकत्रित करून, नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांमध्ये या तरुणांनी संवाद सुरु करून दिला. यावर्षीच्या निवडणुकांमध्ये या संवादामुळे खूपच फरक पडला. निवडणुकीला नागरिकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. मतदान ८७% झाले!
आज इथला तरुण आता संघटीत आहे. आपल्या प्रयत्नांनी काहीतरी सकारात्मक घडेल अशा आशावाद त्यांच्यामध्ये आहे. त्याला त्याचा राग व्यक्त करण्यासाठी वेगळं मध्यम उपलब्ध आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी हमखास होणारा गैरप्रकार यावेळी झाला नाही.
या संघटनेचा इब्राहीम फन्डे म्हणतो की “आज इथला सामान्य नागरीक आपल्या प्रश्नांबाबत आपल्या लोकप्रतिनिधींशी बोलू शकतो. आम्ही प्रत्येक मतदार संघामध्ये लोकप्रतिनिधींशी बोलण्यासाठी मेळावे आयोजित करतो. त्यामुळे अनेक वर्ष तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणाऱ्या जनतेचा आवाज तिकडचे लोकप्रतिनिधी ऐकून घेण्याची तयारी तरी दाखवत आहेत. सुरवातील कितीही अवघड वाटलं तरी इथली परिस्थिती बदलायची असेल तर लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हेचं बदलाचं उत्तम आणि योग्य माध्यम आहेत.”
गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये या तरुण-तरुणींनी असामान्य कामगिरी बजावली. कोनोमधल्या या गावातल्या तरुणांनी त्यांची ‘अशांत’ अशी ओळख बदलण्यासाठी हातभार लावला. या देशात काही बदल सकारात्मक बद्दल घडला तर त्याची ठिणगी नक्कीच या कोनोमधून पेटेल अशी सर्वांनाच खात्री आहे.
हेच तरुण-तरुणी या सियारा लियॉन मधले खरे हिरे; नव्हे का? 
(माहितीचं माध्यम: http://blogs.worldbank.org/publicsphere/sierra-leone-s-cold-spot-young-people-elections-and-accountability-kono)

- प्रज्ञा शिदोरे
(दि. १५ फेब्रुवारी २०१३ रोजी दै.लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणीत प्रकाशित)

Friday, 8 February 2013

पिंक चड्डी कॅम्पेन


-“घरी लवकर परत ये! मुलींनी रात्री अपरात्री घराबाहेर राहणं बरं दिसत नाही! लोक काय म्हणतील?”
-“हे कसले तोकडे कपडे घातलेस.. लोकांच्या नजरा वाईट असतात!”
-“सलवार कमीज वर ओढणी घेच हं.. बरं दिसत नाही”
ही वाक्य मुलींनी सततच ऐकली असतील, आणि अनेक मुलांनी घरचे मोठे लोक आपल्या बहिणींना ही वाक्य सांगतानाही नक्कीच ऐकलं असेल..

पण म्हणजे हे खरंच आहे का? पुरुष मुलींना त्रास देतात, छेड काढतात करण मुलींचे कपडे तोकडे, पुरुषांच्या भावना चाळवणारे असतात? अरे मग स्वत:च्या भावना आवरा ना... हे म्हणजे चोराने “मी चोरी केली कारण मला तुमच्या घराने चोरी करायला प्रवृत्त केलं! तुम्ही घर बदला, म्हणजे मी चोरी करणार नाही!” असं म्हणण्याइतकं हास्यास्पद आहे!

६ फेब्रुवारी २००९ साली मंगलोरमध्ये काही श्रीराम सेनेच्या काही स्वघोषित ‘संस्कृती रक्षकांनी’ पबस् मध्ये जाणाऱ्या मुलामुलींवर हल्ले केले. का? तर पब ही भारतीय संस्कृती नाही. आणि मुलींनी तिथे जाणं हे भारतीय संस्कृतीवर घाला आहे. या पुढे त्यांनी “‘व्हेलेंटाईन्स डे’ला जर कोणी मुलगा मुलगी एकत्र फिरताना दिसले तर त्यांचं लग्न लावून देऊ” अशी घोषणाही केली. या प्रकाराला तेहेलका मासिकाच्या निशा सुझन यांनी उत्तर द्यायचं ठरवलं. त्यांना या विद्वेषाचा सामना प्रेमाने करायचा ठरवला. त्यांनी त्यांच्या श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिक यांच्या कार्यालयात १४ फेब्रुवारीला प्रेमाचं प्रतिक म्हणून गुलाबी चड्ड्या पाठवायचं ठरवलं. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ‘व्हेलेंटाईन्स डे’च्या दिवशी शहरभरातून आलेल्या गुलाबी चड्ड्यांचे ढीग त्यांच्या कार्यालयात बघायला मिळाले.
देशभरातल्या अनेक लोकांना ही पद्धत आवडली. या अशा वेगळ्याच प्रकारच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी पुढचे अनेक दिवस आपापल्या शहरातून कुरियरने चड्ड्यांचे गठ्ठे पाठवायला सुरवात केली. या अशा शांततापूर्वक पण अतिशय अपमानास्पद आंदोलनाला कंटाळून शेवटी मुतालिक यांनी या आंदोलकांशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढण्याची तयारी दर्शवली.

याच वर्षी १२ जानेवारीला बंगळूरूमध्ये काही पुरुषांनी मुलींवर बाह्य रंगरुपावरून टीका टिपण्णी करण्याच्या मानसिकतेला आपला विरोध आणि महिलांच्या सुरक्षेसाठी देशभर चाललेल्या आंदोलनांमध्ये आपला सहभाग दर्शवला. बंगळूरूच्या प्रसिद्ध कब्बन पार्कमध्ये हे २५-३० तरुण मुलींच्या वेशात- म्हणजे अगदी स्कर्ट ब्लाउज वगैरे घालून उभे राहिले.

अहो, पण मुलींवर होणाऱ्या अत्याचारांसाठी मुलींनाच दोषी ठरवायचं हा प्रकार फक्त आपल्या भारतातच नाही तर साऱ्या जगात घडतो आहे. असंच काहीसं २०११ साली कॅनडामध्ये घडलं. टोरांटोमधल्या योर्क युनिवर्सिटी मध्ये स्वसंरक्षणावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होतं. या परिसंवादात मायकल सांगीनेटी या पोलिस अधिकाऱ्याने “जर बायकांना त्यांच्यावर होणारे अत्याचार टाळायचे असतील तर त्यांनी एखाद्या वेश्ये सारखे कपडे घालणं बंद केलं पाहिजे” असं विधान केलं. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याकडून होणारं हे विधान निश्चितच पटण्यासारखं नव्हतं. या कार्यक्रमाच्या संयोजिका सोनिया बारनेट आणि हेदर हार्विस यांनी याच शब्दात उत्तर द्यायचं ठरवलं. त्यांनी आयोजन केलं एका ‘स्लट वॉक’चं. या मोर्चात मुलींनी ‘वाईट चालीच्या मुलींचे कपडे’ ज्याला म्हणतात असे कपडे घालून येणं अपेक्षित होतं. सोनियाच्या मते स्त्रियांना कायमच त्यांच्या बाह्य रूपावरून जोखलं जातं. हा ‘स्लट वॉक’ या पुरुषी मानसिकतेच्या विरोधात आयोजित केला होता. पुढे जगभरातल्या अनेक शहरांमध्ये असे वॉकस् आयोजित केले गेले.

- प्रज्ञा शिदोरे
(दि. ८ फेब्रुवारी २०१३ च्या दै. लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रसिद्ध http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-08-02-2013-606bc&ndate=2013-02-08&editionname=oxygen

Monday, 4 February 2013

बोगोटाचा सुपरमॅन

तुमच्या प्रोफेसरनी कधी तुम्हाला वेडावून दाखवलं आहे...? तुम्ही त्याचं बोलणं ऐकत नाही, वर्गात शांत बसत नाही म्हणून त्याने तुम्हाला त्याचा पृष्ठभाग दाखवला आहे!? नाही ना.. पण या लॅटीन-अमेरिकेमधल्या कोलंबिया देशाची राजधानी बोगोटा मधला प्रोफेसर हे असंच करायचा... आणि हो, त्यानंतर तो बोगोटाचा महापौरही झाला आणि दोनच वर्षापूर्वी कोलंबियाची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकाही त्याने लढवली!
बोगोटा १९९० च्या आसपास एक भकास, घाणेरडं आणि गुन्हेगारांचं आगर म्हणून ओळखलं जायचं. पोलिस, राजकारणी सगळेच भ्रष्ट. कोणाला आपल्या शहराची पडलेलीच नाही हो. रोज दंगली, खून, मारामाऱ्या...

अंतानास मोकस हा कोलंबिया देशाची राजधानी बोगोटा मधल्या एका मोठ्या युनिव्हर्सिटीमधला गणिताचा प्राध्यापक. तिथले विद्यार्थी महा राडेबाज. अशा घाणेरड्या शहरांमधली टाळकी तरी सरळ कशी असणार? पण मोकस या विद्यार्थ्यांमध्ये जरा फेमस म्हणून त्याच्यावर संस्कार करायची त्याना काबूत ठेवायची जबाबदारी त्या युनिव्हर्सिटीमधला लोकांनी त्यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर तो त्याला युनिव्हर्सिटीच कुलगुरू पदही मिळालं.

अशाच एका कार्यक्रमात मुलांनी दंगा चालवला होता. कोणाला ती बोलूच देत नव्हती. कोणी बोलायला उठलं की यांच्या शिट्ट्या टाळ्या सुरु. कितीही सांगितलं तरी ही टवाळ टाळकी काही कोणाचं ऐकत नव्हती. शेवटी मोकस बोलायला उठले तरीही राडा सुरूच. हा सगळा प्रकार बघून ते सरळ स्टेजवर गेले जमलेल्या सगळ्या मुलांकडे एकदा पाहिलं. त्यानंतर, त्या जमावाकडे पाठ करून खाली वाकून त्यांनी चक्क त्यांची पॅंट काढली आणि आपली सफेद चड्डी सगळ्यांना दाखवली!
हे दृश्य अख्ख्या देशांत वाऱ्यासारख पसरलं. अनेकांच्या मते हाच तो क्षण जेव्हा बोगोटामध्ये बदल सुरु झाला. एका युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूनी अशी पॅंट काढणं योग्य आहे का? असं त्याला अनेक टीव्हीवाल्यांनी विचारलं त्यावर त्याचं उत्तर एकच- “हो, मुलांसमोर हे एक नक्कीच वाईट उदाहरण आहे, पण मी जेव्हा पॅंट काढली तेव्हा मुलांना रंग दिसला तो पांढरा.. पांढरा रंग शांततेचा रंग”. पण तरीही या प्रकारामुळे त्याला युनिव्हर्सिटी मधली नोकरी सोडावी लागली.

पण या वागण्यामुळे तो पब्लिकमध्ये भलताच फेमस झाला होता. तो त्यांच्यासाठी एक शांततेचं, स्वछ चारित्र्याचं प्रतिक बनला. लोकांनीच त्याला महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उभं राहायला प्रवृत्त केलं. आणि काय मजा.. आला की हो तो निवडून!
मग काय महापौर झाल्यावर त्यांनी शहरात वेगळ्याप्रकारची राडेबाजी सुरु केली. आधी सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना घराचा रस्ता दाखवला. त्याच्या चमूमध्ये देशातल्या उत्तम तज्ञांची भरती केली. लोकांनी शहरात कचरा टाकू नये म्हणून तो स्वत: चक्क सुपरमॅनचे कपडे घालून रस्त्यावर उतरला आणि शहरभर कचरा उचलत फिरला. रस्त्याचे नियम लोकांनी पाळावेत म्हणून त्यांनी सिग्नल लागला रे लागला की काही 'माईम आर्टिस्ट्स' आणून त्यांच्या पथनाट्यातून हा निरोप पोचवला. मुलींसाठी शहर सुरक्षित रहावं म्हणून एक प्रयोग म्हणून त्यांनी सर्व मुलांना ७ च्या आत घरात जायला लावलं! असे एक ना अनेक उद्योग!

मोकस नेहमीच्या राजकारणी लोकांच्या तुलनेत खूपच वेगळा होता. पण सच्चा होता. शहराच्या चांगल्यासाठी पॅशनेट होता. म्हणूनच तो लोकांना आवडला. जगातलं सर्वात घाणेरडं शहर म्हणून ओळखलं जाणारं बोगोटा आता जगातल्या सर्वात सुंदर, सुनियोजित शहरांमध्ये गणलं जातं.

आपल्याला आपल्या समोर होणाऱ्या गोष्टींमध्ये बदल करायचा असेल तर लगेच पॅंट काढून सुरवात करायची गरज नाही. थोडा वेगळा विचार केला तरी नक्की काम होईल!
- प्रज्ञा शिदोरे