माणसाने आयुष्य कसे जगावे, समाजातील नीती नियम
काय असावेत याबद्दल आपल्याला लहानपणापासून काही गोष्टी शिकवल्या जातात. आपला धर्म
हा आपले हे नीती नियम ठरवण्यात फार महत्वाची भूमिका बजावतो. आज धार्मिक
विद्वेषाच्या आणि दहशतवादाच्या जगात असताना थोडक्यातच पण खूप काही सांगून जाणारा
हा लघुपट नक्की बघाच..!
हे असेच का असते, वेगळे का नाही असे बालमनाला
पडणारे सहज सुलभ प्रश्न नितीनियमांमध्ये बदल करण्यास बहुतांशवेळा तयार नसणाऱ्या
पालकांच्या विरोधात दबून जातात, नष्ट होतात. स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय आणि
क्षमताच जणू नष्ट होते.
या लघुपटातील छोटा नायक मात्र ठरवतो की, आयुष्य जगायचे जे नियम एका
पुस्तकातून मला सांगितले आहेत त्याचा वेगळा अर्थ मी लावणार किंवा ते सोडून देऊन मी
वेगळेच काहीतरी निर्माण करणार!
कोणत्याही परिवर्तनाला घाबरून असणारा पांढरपेशा
समाज, बदलाला विरोध करणारे पारंपारिक विचारसरणीचे लोक, हे वागणे बरोबर ते वागणे
चूक असे काहीतरी ठरवल्याने व्यक्तिगत आयुष्यात काहीतरी गमावणे, वेगळे काहीतरी
करणाऱ्यांबद्दल पांढरपेशा समाजाला असलेली अढी अशा विविध गोष्टी दाखवत हा लघुपट फार
सुंदरपणे पुढे सरकतो.
अखेर मात्र लघुपटाचा छोटा नायक निर्धाराने बदल
करतो आणि जगाला तोंड देतो. त्याच्या लक्षात येतं की असे बदल करणाऱ्या मंडळींनी जग
किती सुंदर आणि वैविध्यपूर्ण करून ठेवलं आहे!
सुंदर एनिमेशन, ‘कपाट व ड्रौवर’ यांचा अत्यंत
प्रभावी प्रतीकात्मक उपयोग यामुळे हा लघुपट वेगळीच उंची गाठतो. थेरामीन ट्रीज आणि
क्वलीया सूप दोन भावांनी मिळून या अप्रतिम लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.
नक्की बघा ८ मिनिटांचा लघुपट ‘आयुष्याचे मैन्युएल’ अर्थात-
Instruction Manual for Life!
- तन्मय कानिटकर
(दि. ३० नोव्हेंबरच्या दै. लोकमत मध्ये प्रसिद्ध http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-29-11-2012-ea98a&ndate=2012-11-30&editionname=oxygen )