Friday, 18 May 2012

माहितीचा खजिना!

लिफ्टचा शोध कोणी लावला? इंटरनेट कोणी तयार केले? मशीन्स बनतात कशी? पेटंट म्हणजे काय? पहिली बंदूक कोणी आणि कधी बनवली?
असे शेकडो प्रश्न तुम्हाला पडतात? रोजच्या जीवनात शेकडो गोष्टी आपण वापरत असतो. पण त्या वापरत असताना त्या बनल्या कशा, कोणी पहिल्यांदा बनवल्या असे प्रश्न आपल्याला पडतात? पण मग या गोष्टींची नेमकी आणि विश्वासार्ह माहिती कुठे मिळणार? त्यासाठीच आहे “हाऊ स्टफ वर्क्स” ही वेबसाईट!
मार्शल ब्रेन नावाच्या एका प्रोफेसरने १९९८ मध्ये या वेबसाईटची सुरुवात केली. आणि असंख्य विषयांवर अतिशय सोप्या भाषेत माहिती द्यायला सुरुवात केली. या वेबसाईटवर मोडलेल्या व्हाक्युम क्लीनरचे काय करावे इथपासून गोल्फचा इतिहास काय, ‘एप्रिल फूल’ मागे काय इतिहास आहे अशा अक्षरशः कोणत्याही विषयावर माहिती उपलब्ध आहे.
टाईम या जगप्रसिद्ध मासिकाने २००६-२००७ सलग दोन वर्षे जगातील सर्वोत्तम २५ वेबसाईटस् मध्ये हाऊ स्टफ वर्क्स या वेबसाईटचा समावेश केला होता. “डिस्कव्हरी कम्युनिकेशन”ने या वेबसाईटचे हक्क २००३ मध्ये विकत घेतल्यापासून या वेबसाईटची विश्वासार्हता अधिकच वाढली. या वेबसाईटला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. जगभरचे सर्व वयोगटातले लाखो लोक नित्यनेमाने ही वेबसाईट बघतात आणि त्यावरच्या माहितीचा लाभ घेतात.
ही वेबसाईट म्हणजे माहितीचा हवा तितका खजिना असलेली अलीबाबाची गुहा आहे आहे आणि हा खजिना सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे!
नक्की पहा: http://www.howstuffworks.com/

-    तन्मय कानिटकर
(दि. १८ मे २०१२ रोजी दै. लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रकाशित. http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=OxygenEdition-57-1-17-05-2012-496d2&ndate=2012-05-18&editionname=oxygen)

No comments:

Post a Comment