जगातल्या सर्व देशांचे मूल्यांकन त्याच्या GDP (Gross Domestic Product - देशांतर्गत एकूण उत्पन्न) वर होते. एखाद्या देशाचा GDP वाढल्याने त्या देशाच्या नागरिकांचे राहणीमान उंचावत असेल, पण त्यांच्या आनंदात वाढ होते का ? आनंदी असणं हे पैशावर कितपत अवलंबून आहे ? आनंदाचे मूल्यमापन करता येते क ? भूतान ह्या देशानी हे तपासायचे ठरवले.
२००५ साली भूतान मध्ये “Gross National Happiness Commission” स्थापन करण्यात आलं. ह्या संस्थेचा पाया ४ सूत्रांवर बेतलेला आहे. ही सूत्रे ध्यानात घेऊनच मग पंचवार्षिक योजना, धोरणे, कायदे इ. बनवले जातात:
१. जबाबदार लोकशाहीसाठी मोकळे अर्थकारण
२. आपली संस्कृती आणि निसर्ग जोपासणे
३. सक्षम प्रशासन
४. देशाचे नागरिक हीच सर्वात मोठी संपत्ती
ह्या संस्थेनी २०१० साली भूतान चा “Gross Happiness Index” काढला. त्यात अनेक निकष तपासले – मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य; वेळेचा उपयोग; आपल्या संस्कृती बद्दलची जाण आणि आस्था; राहणीमान; शिक्षण; सामाजिक सुरक्षितता; निसर्ग जोपासायची वृत्ती इ. ह्या तपासणीतून प्रशासनाला आपल्याच नागरिकांची नव्याने ओळख झाली. लोकांना काय हवे आहे; ते समाधानी आहेत का; त्यांच्या सरकार कडून काय अपेक्षा आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं मिळत गेली.
जगाच्या यादीत भूतान चा क्रमांक काहीही असो, नागरिकांनी आनंदी असणे भूतानसाठी जास्त महत्वाचे आहे कारण आनंदी माणूस काम चांगले करतो, आणि आपोआपच तो देश समृद्ध होतो !
नक्की पहा:
- मानसी ताटके
(दि.११ मे २०१२ रोजी दै लोकमतच्या ऑक्सिजनपुरवणीमध्ये प्रकाशित http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=OxygenEdition-57-1-10-05-2012-6e62d&ndate=2012-05-11&editionname=oxygen)
No comments:
Post a Comment