Friday, 30 March 2012

चला कल्पनांच्या विश्वात..!

कल्पनेध्ये खूप मोठी ताकद असते. कल्पनांमध्ये माणसाच्या रोजच्या जगण्यामधे मोठा बदल घडविण्याची क्षमता असते. कल्पना जगात मोठे बदल करायला कारणीभूत ठरतात. म्हणूनच TED या संस्थेने या जगात मोठे बदला करण्याची क्षमता असलेल्या कल्पना तुमच्या-आमच्यासाठी खुल्या केल्या आहेत त्या या संकेतस्थळावरील चित्रफितीद्वारे.

याची सुरवात १९८४ मधे T- Technology (तंत्रज्ञान) E- Entertainment (करमणूक) आणि D- Design (रचना) या तीन विश्वांना एकत्र आणून त्यावर समग्र विचार व्हावा यासाठी केली गेली होती. या संस्थेच्या सुरुवाती मागे जगातील काही महत्वाची डोकी कारणीभूत आहेत. त्यामधे मायक्रोसॉफ्ट्चा संस्थापक बिल गेट्‍स, गुगलचे लॅरी पेज, विख्यात मनोवैज्ञानिक स्टीव्हन पिंकर सारखी मंडळी आहेत.

विविध क्षेत्रातील कल्पक व्यक्तींनी आपले नाविन्य, अनुभव इतर तज्ञांना सांगितले तर त्याचा उपयोग बर्‍याच क्षेत्रांना होऊ शकतो असे या संस्थेचा अनुभव आहे.
आज या संकल्पनेचा व्याप पुष्कळ वाढला आहे. आज इथे जगातल्या अनेक तज्ञ व्यक्तिंचं त्यांच्या विषयातलं ज्ञान व्हिडीओजच्या स्वरुपात सर्वांना उपलब्ध आहे. तज्ञांबरोबरच ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात काही अभिनव प्रयोग केले आहेत अशा प्रयोगांबद्दलही इथे बोलले जाते.

इथल्या सर्व व्हिडीओजची इंग्रजी प्रतिलीपीही (ट्रांस्क्रीप्ट) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. काही ट्रांस्क्रीप्ट्स्‍चा तर हिंदी आणि मराठी अनुवादही झाला आहे. आपल्या आवडत्या विषयात नाविन्य आणण्यासाठी आणि मुख्यत: आपलं जगण समृद्ध करण्यासाठी आपण नेहमीच जगात काय चाललं आहे याचं भान ठेवलं पाहिजे. हे संकेतस्थळ यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल


नक्की बघा: www.ted.com

- प्रज्ञा शिदोरे
(३० मार्च २०१२ रोजी "लोकमत"च्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रकाशित)

Thursday, 29 March 2012

नव्या युगाचं शिक्षण

विचार करा, गणितासारखा विषय जर तुम्हाला तुमच्या घरी, मित्र-मंडळींबरोबर मजा करत काही व्हीडीओ बघत बघत शिकता आला तर? काय मजा येईल ना! आणि आता हे अगदी सहज शक्य आहे ते ‘खान अकॅडेमी’ या संकेतस्थळामुळे.
२००६ साली सलमान खान नावाचा एक व्यावसायिकाने आपल्या भाच्चे कंपनीला गणिताच्या काही संकल्पना समजावाण्यासाठी एक व्हीडीओ तयार केला आणि तो यु-ट्यूब वर टाकला. आश्चर्य म्हणजे तो व्हीडीओ अनेक जणांनी पहिला आणि त्याला फारच चांगला प्रतिसादही आला. अशा व्हीडीओज् चा इतरांना का उपयोग होऊ नये? इथूनच ‘खान अकॅडेमी’ ची संकल्पना पुढे आली.
खान अकॅडेमी हे एक शैक्षणिक साहित्य पुरविणारे संकेतस्थळ आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या संकेत्स्थावरील साहित्य सर्वांसाठी अगदी विनामूल्य उपलब्ध आहे. इथे गणित पासून जीवशास्त्रापर्यंत आणि भूगोलापासून ते इतिहासापर्यंत सर्व विषयांवर ७ ते १४ मिनिटांचे छोटे-छोटे असे ३००० च्या वर व्हीडीओज् आहेत. तुम्ही शाळेतले विद्यार्थी असाल तर तुम्हाला तो विषय नीट समजून घेण्यासाठी शिक्षक असाल तर तो विषय कसा मांडावा याची कल्पना येण्यासाठी नाहीतर अगदी गम्मत म्हणून काहीतरी नवीन बघायचं असेल तर इथला ‘फ्रांसमधील चित्रकार’असा एखादा व्हीडीओ बघू शकता.
एखादी संकल्पना जर आपल्याला चित्ररूपात समजावली तर आपल्याला ती अधिक काल लक्ष्यात राहते असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच आज अमेरिकेमधल्या अनेक शाळांमध्ये हे व्हीडीओज् रोजच्या अभ्यासक्रमात घेतले आहेत.
तर नक्की बघा: www.khanacademy.org
- प्रज्ञा शिदोरे
(२३ मार्च २०१२ रोजी लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रकाशित: http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=OxygenEdition-57-1-21-03-2012-6f386&ndate=2012-03-23&editionname=oxygen)