Friday, 8 June 2012

मान्सूनचा पाठलाग

संपूर्ण भारतात मे महिन्याच्या अखेरीस जेव्हा सगळा प्रदेश उन्हाने भाजून निघालेला असतो, पाणी प्रश्नावर उलटसुलट चर्चा होत असतात तेव्हा सगळ्यांच्याच गप्पा हा पाऊस येणार कधी?’ या विषयाच्या अवतीभवती फिरत असतात. शहरी भागातल्या गप्पा रेनकोट कधी आणायचा, छत्री दुरुस्तीला कधी टाकायची, वाळवणं कधी संपवायची अशा निर्णयांसाठी होतात. पण ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या आयुष्यात त्याचे शेतीमधले सर्व निर्णय हे पाऊस कधी येणार?’ या एकाच प्रश्नाभोवती फिरत असतात.

मे महिन्याच्या शेवटाला जेव्हा सूर्याने जमिनीला पुरते भाजून काढलेले असते. शहरी भागात पाणी प्रश्न आ वासून उभा असतो. ग्रामीण भागात दुष्काळाची चिन्हं जाणवू लागली असतात, तेव्हा एकच प्रश्न सर्वाना भेडसावत असतो- पाऊस कधी पडणार?’ नॅशनल जिओग्राफिक मासिकाच्या दोन पत्रकार २००८ साली महाराष्ट्रात आल्या आणि १० जिल्हे फिरून दीड वर्ष त्यांनी या प्रश्नाचा मागोवा घेतला.
संपूर्ण भारतात मे महिन्याच्या अखेरीस जेव्हा सगळा प्रदेश उन्हाने भाजून निघालेला असतो, पाणी प्रश्नावर उलटसुलट चर्चा होत असतात तेव्हा सगळ्यांच्याच गप्पा हा पाऊस येणार कधी?’ या विषयाच्या अवतीभवती फिरत असतात. शहरी भागातल्या गप्पा रेनकोट कधी आणायचा, छत्री दुरुस्तीला कधी टाकायची, वाळवणं कधी संपवायची अशा निर्णयांसाठी होतात. पण ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या आयुष्यात त्याचे शेतीमधले सर्व निर्णय हे पाऊस कधी येणार?’ या एकाच प्रश्नाभोवती फिरत असतात.
या दरवर्षी होणाऱ्या घालमेलीचा, अनिश्चिततेचा सामान्य नागरिकांवर, मुलांवर नक्की काय परिणाम होतो? पाऊस येतो तेव्हा नक्की कसं वातावरण असतं? कसं केलं जातं पहिल्या पावसाचं स्वागत? पावसाच्या या शोधामागे किती मोठं अर्थकारण दडलं आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला नॅशनल जिओग्राफिक मासिकाची टीम २००८च्या उन्हाळ्यात पुण्यात आली.
२००६ साली पुण्याच्या आमच्या ग्रीनअर्थ या कन्सल्टिंग कंपनीने दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातल्या नऊ जिल्ह्य़ांतल्या सर्वात गरीब १५१ गावांमधून पदयात्रा काढली. या तीन महिन्यांच्या पदयात्रेमध्ये महाराष्ट्रातल्या काही सामाजिक संस्था आणि बऱ्याच स्वयंसेवकांनीही भाग घेतला होता. या पदयात्रेत आलेले अनुभव एका विस्तृत अहवालामधून अभ्यास गटाने मांडले. यांनी त्यांचा एक इंग्रजी अहवाल त्यांच्या संकेतस्थळावरही टाकला होता.

पावसाच्या गप्पा
माझा लिंडसीबरोबरचा दिवस सकाळी ५ वाजता कॅमेऱ्याला सूर्याची पहिली किरणं भावतात म्हणून सुरू व्हायचा. मध्यान्हापर्यंत कामाचा पहिला टप्पा संपायचा. दुपारी राहण्याच्या ठिकाणी येऊन घेतलेल्या छायाचित्रांची माहिती लिहिणे चालायचे. दुपारी ५ ते ७ परत छायाचित्रीकरणाचा दुसरा टप्पा सुरू व्हायचा.
साराबरोबर दिवसभर (अनेकदा त्यांच्या दोन खोल्यांमध्ये राहूनही) लोकांशी बोलणं सुरू असायचं. तिची टिपणं आणि माझं लोकांना बोलतं करणं आणि त्यांच्या बोलण्याचा संदर्भ पटवत ते तिला सांगणं सुरू असायचं. घरी आल्यावर कित्येकदा मनात भाषांतरच सुरू असायचं.

नॅशनल जिओग्राफिकबरोबर ओळख
२००८ सालच्या जून महिन्यामध्ये नॅशनल जिओग्राफिकचा एक चमू महाराष्ट्रातला मान्सून, दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या या विषयांवर अभ्यास करत होता. शोधता शोधता, त्यांच्या नजरेत हा ग्रीनअर्थनी योजलेल्या पदयात्रेचा अहवाल पडला. ही पदयात्रा काढणारे, महाराष्ट्रातल्या दुष्काळावर, पावसावर अहवाल लिहिणारे कोण? याचा माग काढत ते आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांच्या मान्सूनबरोबरच्या या प्रवासात आम्हीही त्यांच्याबरोबर फिरणार, त्यांना मदत करणार हे पक्के झाले.
जिओग्राफिककडून दोन मंडळी येणार होती. एक लेखिका सारा कॉर्बेट आणि दुसरी छायाचित्रकार लिंडसी अडारियो. सारा ही न्यूयॉर्क टाइम्सची स्तंभलेखिका होती आणि लिंडसीने टाइम, न्यूजवीक, न्यूयॉर्क टाइम्स अशा बऱ्याच आंतरराष्ट्रीय प्रकाशनांसाठी वॉर फोटोग्राफरम्हणून काम केले होते. जिओग्राफिक मासिकाबरोबर या दोघींचीही ही पहिलीच असाइनमेंट होती.

नॅशनल जिओग्राफिकची ओळख
नॅशनल जिओग्राफिक ही १८८८ साली अमेरिकेत स्थापन झालेली एक सामाजिक संस्था आहे. या संस्थेचा उद्देश लोकांना आपल्या पृथ्वीची काळजी घेण्याची प्रेरणा देणेहा आहे. संस्थेचे ८ विश्वस्त विविध उपक्रमांतून हा उद्देश साध्य होतो आहे ना, याकडे लक्ष ठेवत असतात.

राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेता घेता मी ग्रीनअर्थबरोबर, छायाचित्रण, पाण्यावरच्या लिखाणावरचे टीपण तयार करणे अशी छोटीछोटी प्रासंगिक कामे करत होते. त्याचबरोबर दुष्काळाच्या पदयात्रेतही मी काही दिवस छायाचित्रणाचे काम केले होते. शिक्षण-परीक्षा वगैरे संपल्यावर नक्की काय करायचे हा विचार सुरू होताच. तेव्हा ग्रीनअर्थने जाणार का जिओग्राफिकबरोबरअसं विचारल्यावर मी एका पायावर तयार झाले.
पदयात्रेतील सहभागाची पाश्र्वभूमी, छायाचित्रणाची आवड, टाइम-न्यूजवीक-जिओग्राफिकसारखी मासिकं अनेक रात्री उशीखाली घेऊन झोपणारी मी या संधीकडे विशेष जबाबदारीने बघू लागले आणि सारा व लिंडसी या दोघींना भेटण्याआधी मान्सून, दुष्काळ, महाराष्ट्रामधले पर्जन्यछायेखालचे प्रदेश इत्यादी विषयांची कसून तयारी करू लागले. याच काळात अलेक्झांडर फ्राटर यांचे चेसिंग द मॉन्सूनहे पुस्तकही वाचनात आले. फ्राटर यांनी भारत आणि बांगलादेशमधल्या मान्सूनचा पाठलाग केला होता. त्यांनी या दोन महिन्यांच्या काळात घेतलेले विलक्षण अनुभव या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. भारतीय सांस्कृतिक जीवनावर मान्सूनचा कसा प्रभाव आहे हे समजून घ्यायचे असेल तर वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे.
सारा आणि लिंडसी या दोघींची ही असाइनमेंट सुरू करण्याआधी केलेली तयारी बघण्यासारखी होती. साराला गेल्या पाच वर्षांत पावसाची परिस्थिती, त्याचे पिकांवर होणारे परिणाम, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्याची कारणे, पर्जन्यछायेतले प्रदेश, पावसाच्या आगमनाचे काही सांस्कृतिक संकेत इत्यादींबद्दल ढोबळ पण अचूक माहिती होती. तिच्याकडे पहिल्या भेटीमध्ये तज्ज्ञांना विचारायचे प्रश्न, गावातल्या बायकांना, मुलांना विचारायच्या प्रश्नांची यादी तयार होती. लिंडसीला, साराच्या लिखाणाला पूरक छायाचित्रे कशी असतील याची भलीमोठ्ठी यादी तयार होती. याचबरोबर दोघींकडे काही संस्थांचे नंबर, नक्की बघायचीच अशा ठिकाणांची नावे तयार होती. या सगळ्या माहितीबरोबर जो स्थानिक शहाणपणा आणि जे स्थानिक संदर्भ लागतात ते त्यांना आमच्याकडून अपेक्षित होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी लिंडसीबरोबर आणि माझी सहकारी विनीता ताटके साराबरोबर दुभाषाचे काम करणार होतो. जिओग्राफिकच्या या लेखासाठी जवळजवळ दीड वर्ष काम सुरू राहणार होतं.
तो असतो तेव्हा सगळं असतं-नसतो तेव्हा काहीच नाही
आमच्यापुढे सर्वात मोठा प्रश्न होता तो हा दौरा सुरू कधी करायचा? पाऊस नक्की कधी सुरू होणार हे जर कळलं असतं तर महाराष्ट्रातले अनेक प्रश्न कदाचित सुटले असते. मग अनेक तज्ज्ञांशी चर्चा करून, काही शेतकऱ्यांच्या अनुभवावर विश्वास ठेवून, स्थानिक वृत्तपत्रातल्या बातम्यांवर लक्ष ठेवत आमची अंदाज बांधणी सुरू होती. शेवटी पर्जन्यछायेखालचा नगर जिल्हा इथपासूनच सुरुवात करायचे पक्के झाले. आम्ही नगर जिल्ह्य़ातल्या सतीची वाडी या गावाची निवड आमचे मुख्य गाव म्हणून केली. बऱ्याच दृष्टीने हे गाव योग्य होते.
इथे ६ ते ७ वर्षे वॉटरशेडचं काम सुरू होतं, याच्या शेजारीच नांदूरखंदरमाळ हे गाव पठारावरचं आणि पाणी जिरवायची कोणतीही यंत्रणा नसलेलं होतं. त्यामुळे आम्हाला शेती आणि पाण्यामधला फरक करता येणार होता. इथे आम्हाला पावसासंबंधी बऱ्याच कथा सांगणाऱ्या, अंदाज बांधायच्या पद्धती सांगणारे विलक्षण लोक भेटले. याच गावातल्या अनुसूयाबाई पवार यांचं एक वाक्य कायम आठवत राहतं. लिंडसीतर्फे मी त्यांना पाऊस आल्यावर काय करता? पहिल्या पावसात कशी मजा असते वगैरे प्रश्न विचारत होते. पाऊस म्हणजे काय वाटतं हो? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या होत्या ‘‘हे बघ बाई, माझं आयुष्य हे या पावसाभोवतीच फिरतं, तो असतो तेव्हा सगळं असतं- तो नसतो तेव्हा काहीच नाही’’ हे बोलताना त्यांच्या डोळ्यातली ती असुरक्षिततेची भावना मन सुन्न करून टाकणारी आहे. पुढच्या दीड वर्षांत आमची या आज्जींशी घट्ट मैत्री जमली होती.
पावसाचं अर्थकारण/ दुष्काळ आवडे सर्वाना
आठवडाभराच्या नगरमधल्या वास्तव्यानंतर आम्ही बीड जिल्ह्य़ाकडे रवाना झालो. बीडमधल्या शहरी भागात पाणीपुरवठा फक्त टँकरने होत होता आणि हे चित्र नजीकच्या काळात बदलण्याची काहीच चिन्हं दिसत नव्हती. आठवडय़ातून एकदा टँकरने का होईना पाणी येतं, म्हणजे पाणी आहे. आसपासच आहे. नंतर काही टँकर्सचा पाठलाग केल्यावर असं लक्षात आलं की ते पाणी नगरपालिकेच्या नळांमधून किंवा कोणाच्या तरी खासगी विहिरीमधून भरलं जातं. या टँकर्समागे दरदिवशी लक्षावधी रुपयांचे व्यवहार एकटय़ा बीडमध्ये होत असतात. पाण्याची ही परिस्थिती असताना या दुष्काळी भागात भूजल उपसून पिण्याच्या पाण्याचे कारखानेही बघायला मिळाले. कळलेल्या माहितीप्रमाणे दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याची मागणी खूप जास्त प्रमाणात वाढल्यामुळे इथले हे कारखानेही चांगला गल्ला जमवतात. हे सगळं बघता बघता आमचा पावसाच्या काळ्या ढगांसाठीचा शोध सुरू होताच.
बीडनंतर आम्ही जामखेड जवळच्या खेडय़ात विहिरीचे खोदकाम बघायला गेलो. पानाडय़ाचा रेटपाऊस नसल्याने फार वाढला होता. पाणी लागेल अशी जागा सांगायला हा रु. २०,००० त्याने सांगितलेल्या ठिकाणी जर पाणी लागलं तर त्याला दुप्पट पैसे द्यायला लागायचे. पण सांगितलेल्या जागी पाणी का लागलं नाही? सोप्पं आहे- पूर्व जन्मीचे पाप! या सोप्प्या समीकरणामुळे पानाडय़ांची संख्याही खूप वाढली होती. पावसाच्या आशेने जसे लोक आपले कमावलेले पैसे टँकर, पानाडय़ांवर खर्च करत होते तसेच तमाशांचे फडही वाढत होते.
पावसाची वाट पाहणारी माणसं
या दीड वर्षांच्या काळात लिंडसीने ३०,००० च्यावर छायाचित्रे घेतली. मुख्य लेखामध्ये यातील केवळ १६ छायाचित्रे होती. तिच्या सांगण्यानुसार, काही अप्रतिम शॉट्स फक्त त्या फ्रेममधल्या व्यक्तीची अपुरी माहिती असल्याने गाळले गेले.
या पावसाबरोबरच्या प्रवासामध्ये १६ वर्षांचा आपल्या आईवडिलांना कर्जाच्या बोजातून बाहेर यायला मदत करणारा वाल्मीक भेटला. पावसावरच आयुष्य आहे असं सांगणाऱ्या पण तरीही आशावादी अशा अनुसूयाबाई भेटल्या, काही संस्था चालवणारे भेटले. नांदूरखंदरमाळमधली शाळा सोडून पाणी भरायला घरात बसलेली १२ वर्षांची छाया ठकार भेटली. शेवटी पाऊस आला तेव्हा सतीच्या वाडीमधले लोक, पाणी जिरवायला आणि ते दीर्घकाळ वापरायला तयार होते. ज्या गावांमध्ये लोक तयार नव्हते त्यांना आलेल्या पावसात भागवून जानेवारीमध्ये पुन्हा पावसाची वाट बघत बसणं भाग होतं.
अत्यंत अभ्यासू, दिवस-रात्र नियोजित कामाचा ध्यास असलेल्या, अचूक आणि नेमक्या माहितीसाठी झटणाऱ्या सारा आणि लिंडसी परत गेल्या. २००९ च्या नोव्हेंबर महिन्यात आमचा लेख जिओग्राफिकमध्ये छापूनही आला. पण अजूनही माझ्या डोळ्यासमोर ती पावसाची वाट बघणारी माझ्या महाराष्ट्रातली माणसं तशीच आहेत.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या
२००५-०६ साली दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल अनेक आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्येही बातम्या येत होत्या. त्यामुळे लिंडसीच्या फार विचित्र मागणीला सामोरे जावे लागले. तिला बघायचे होते एक नुकतेच आत्महत्या झालेले घर. तिच्या म्हणण्याप्रमाणे जर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मयतीला जाता आलं तर सर्वात उत्तम!तिचं म्हणणं एका अर्थी खूप खरं होतं, ती एक पत्रकार-छायाचित्रकार म्हणून या घटनेकडे तिऱ्हाईतासारखी बघत होती. या वॉर फोटोग्राफरला मृत्यू नवीन नव्हता. हे बघ प्रज्ञा, तुला जमणार नसेल लोकांना विचारायला तर सोडून दे. कदाचित यांनी आपल्याला आपल्या लेखातल्या सर्वात बोलक्या छायाचित्राला मुकावं लागेल, ठीक आहे, पण तुला खरी गोष्ट लोकांपुढे कधीच ठेवता येणार नाही आणि त्यामुळे तुझं मन तुला कायम खात राहील हेही लक्षात ठेव.तिच्या म्हणण्यानुसार खऱ्या पत्रकाराने एकदा कॅमेरा गळ्यात अडकवला की त्या घटनेच्या मुळापर्यंत जाऊनही त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहायचं असतं. सुदान, अफगाणिस्तानमधल्या युद्धांमध्ये काम केलेल्या या छायाचित्रकाराची ही वाक्य- यात माणुसकी-कार्यतत्परता याबद्दलचे माझ्या मनातले द्वंद्व पुसून टाकले गेले आणि आम्हाला आमच्या लेखासाठी सर्वात बोलके छायाचित्र मिळाले.
अखेर पाऊस आला भेटीला
या काही मन सुन्न करणाऱ्या अनुभवांनंतर आम्ही बीडकडून उस्मानाबादेत येताना आम्हाला काळे काळे ढग जमताना दिसले. सतीचीवाडीमधल्या अनुसूयाबाईंनी सांगितल्याप्रमाणे हा पाऊस हस्ताचा होता. प्रचंड गडगडाटाने पाऊस सुरू झाला. त्या वेळी आम्ही कोणत्याच गावाजवळ नव्हतो म्हणून या भागातल्या पहिल्या पावसात गावांमध्ये काय घडत होतं ते आम्ही पाहू शकलो नाही. लिंडसीला या पावसाळ्यात हा शॉट मिस केल्यामुळेअतिशय वाईट वाटलं. म्हणून पुढच्या वर्षीच्या पावसात केवळ ही एक फ्रेम मिळावी म्हणून तिच्याबरोबर मलाही सतीच्या वाडीत आठवडाभर बसवून ठेवलं.
या लेखासाठी पुढे जवळजवळ सहा महिने काम सुरू होतं. मी लिंडसीची साहाय्यक असल्याने माझ्याकडे प्रत्येक छायाचित्र घेतले की त्या दिवसाची तारीख, वेळ, फ्रेममधल्या सर्व व्यक्तींची नावे, शक्यतो दूरध्वनी क्रमांकासकट असणे अपेक्षित होते. प्रत्येक छायाचित्रातल्या व्यक्तींची नावे पडताळून पाहणे, जागेचे नाव, तारखा तपासून पाहणे यासाठी जिओग्राफिक मासिकाच्या इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटकडून असंख्य मेल्स आणि फोन कॉल्स झाले.
अत्यंत अभ्यासू, दिवस-रात्र नियोजित कामाचा ध्यास असलेल्या, अचूक आणि नेमक्या माहितीसाठी झटणाऱ्या सारा आणि लिंडसी परत गेल्या. २००९ च्या नोव्हेंबर महिन्यात आमचा लेख जिओग्राफिकमध्ये छापूनही आला. पण अजूनही माझ्या डोळ्यासमोर ती पावसाची वाट बघणारी माझ्या महाराष्ट्रातली माणसं तशीच आहेत.

 - प्रज्ञा शिदोरे
( दि.१५ जून २०१२ च्या लोकप्रभा या साप्ताहिकात हा लेख प्रसिद्ध झाला आहे. http://www.lokprabha.com/lokprabha/20120615/cover_story.htm)

Friday, 1 June 2012

फरक काय पडतो ?

कधी कधी एकाच अर्थाचे दोन शब्द असताना कुठला शब्द कुठे वापरायचा असा प्रश्न आपल्याला पडतो. पायात घालतो ते शूज का बूट ? प्रवासात आपण luggage” नेतो का baggage”? तुमच्या अश्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील differencebetween.com ह्या site वर.

नावाप्रमाणेच ह्या संकेतस्थळावर अनेक वेगवेगळ्या संज्ञांमधले फरक आणि अर्थ दिले आहेत.  ह्याच्यात बरेच विभाग आहेत - Technology, Home, Science and Nature, Education, Public, Health, Business, People, Fashion, इ. प्रत्येक विभागात वेगवेगळे उपविभाग आहेत ज्यात त्या विषयातल्या वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये काय फरक आहे ते सांगितले आहे. तसेच एकाच अर्थाच्या दोन भिन्न शब्दांची ओळख सुद्धा दिली आहे. कुठला शब्द कुठे आणि केव्हा वापरावा हे दिले आहे.

संकेतस्थळाच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात दोन शब्द किंवा संकल्पना दिल्या तर त्यांच्यातला फरक सांगणाऱ्या links ची यादी येते. शब्द किंवा संकल्पनाच कशाला, अगदी सध्याच्या latest “Apple iPad 3” आणि “Galaxy Tab 8.9 4G” यांच्यातला फरक सुद्धा कळू शकेल ! आणि तुम्हाला जर दोन संकल्पनांमध्ये एखादा फरक माहित असेल तर तुम्ही सुद्धा त्याच्यावर लिहू शकता!

जाता जाता एकच विचारते...आपल्याला जेव्हा घरी जेवायचा कंटाळा येतो तेव्हा आपण कुठे जातो ? होटेल मध्ये...बरोबर ? चूक ! आपण रेस्तराँ मध्ये जातो !!!

फरक नक्की शोधा:



मानसी ताटके

दि. १ जून रोजी, दै.लोकमतच्या ऑक्सिजन पुरवणीमध्ये प्रकाशित. http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=OxygenEdition-57-1-31-05-2012-b40fe&ndate=2012-06-01&editionname=oxygen