Wednesday 23 May 2012

रूपया का घसरला?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आजच्या दिवशी (२३ मे २०१२) किंवा गेल्या ३-४ दिवसात रूपया घसरला हे काही एकदम किंवा नवीनच काहीतरी आक्रित घडलेले नाही. रूपया घसरणयाची कारणे नव्याने शोधण्यात वेळ घालवायची काहीच गरज नाही. कारणे ही जुनीच व माहित असलेलीच आहेत. फरक एवढाच की, ही कारणे जागतिक मंदी नसताना जेवढी जाणवत नव्हती, तेवढी ती आता प्रखर परिणामकारक ठरत आहेत. अगोदरच कुपोषित असलेल्या बालकाची तब्येत दुष्काळ आला आणि एकदमच ढासळली यात नावीन्य ते काय? हे होणारच होते ! असेच आपल्या भारताचे !

परदेशी सहल करणार असाल तेव्हा, किंवा इतरही काही वेळेला सहजच उत्सुकता म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या देशाच्या चलनाची रूपयामधील किंमत पाहता, ती कशी ठरलेली असते? तर भारताचे त्या त्या देशाशी असलेल्या व्यापारसंबंधांवर. आज जागतिकीकरणाच्या युगात देशादेशांमधील व्यापाराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. किंबहुना, प्रत्येक देशाची पत- श्रीमंती वा गरिबी ही व्यापार याच घटकावर अवलंबून आहे.

भारत इतर देशांमधील वस्तू व सेवांची आयात निर्यात म्हणजेच त्यांच्यातील व्यापार हा कोणासाठी फायद्याचा अथवा तोट्याचा आहे यावरून संबंधित देशांच्या चलनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ठरते. उदाहरणार्थ – भारत व चीन मधील व्यापार, चीनमधून आयात वस्तूंचे प्रमाण भारतामधून चीनला निर्यात होणार्‍या वस्तूंपेक्षा जास्त असेल, म्हणजेच भारतासाठी निर्यात कमी व आयात जास्त अशी स्थिती असेल, अशामध्ये भारत चीनला जास्त रूपये (आयातमालाची किंमत) देऊ लागतो. यात भारताची व्यापारतूट व उलटपक्षी चीनची व्यापार नफेखोरी दिसते. यावरून आपणास असे समजते की, ज्या देशाची आंतरराष्ट्रीय बाजारातील निर्यात जास्त, तितके त्या देशाच्या चलनाचे मूल्यांकन अधिक.   

आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतागुंतीचे देशांतरित व्यवहार सोयीचे करण्यासाठी प्रत्येक देशाच्या चलनाचे मूल्यांकन ठरविण्यासाठी अमेरिकेचा डॉलर हे एकच प्रमाण  (standard currency) म्हणून स्विकारले. (याचे कारण असे की, अमेरिकेचा जगातील प्रत्येक देशाशी होणार्‍या व्यापाराचे व एकूणच अमेरिकेच्या बाजारातील व्यापाराचे प्रमाण हे इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत प्रचंड आहे). व्यापारासाठी प्रत्येक देशाने आपल्याजवळील डॉलरचा साठा वाढविण्यास सुरूवात केली ती याच काळात व याच कारणासाठी. सध्या भारताचा परकीय चलनाचा साठा ४२ अब्ज डॉलरपर्यंत खाली आला असून कर्ज मात्र १०१ अब्ज डॉलरवर पोचले आहे.      

म्हणजे आज जी आपण रूपयाची अमेरिकी डॉलर च्या तुलनेतील घसरण पाहतो, ती केवळ भारताचा अमेरिकेशी होणार्‍या व्यापारातील तूट आहे असे नाही. कारण भारताचा जगातील इतर सर्व देशांशी होणार्‍या व्यापाराचे (तूट अथवा फायदा) हे मोजण्याचे प्रमाण –एकच- रूपयाचे अमेरिकी डॉलरच्या तुलनेतील मूल्यांकन.

आज भारताचा व्यापार हा मुख्यत्वे आखातातील देश व युरोपातील देशांशी चालतो. आपल्या देशाचा सर्वात जास्त पैसा खर्च होतो तो इंधन आयातीवर. औद्योगिक प्रगतीच्या ओघात अवजड उद्योग, तसेच अनावश्यक मोटारींचा अतिवापर यामुळे देशाच्या आजच्या इंधन आयातीत ऐतिहासिक वाढ दिसते. देशातील ७०% इंधन आयात करावे लागते, त्यामुळे त्यावर देशाच्या उत्पन्नातील ३०% इतके प्रचंड परकीय चलन खर्च करावे लागते. इतके पैसे मोजून आयात केलेल्या याच इंधनावर देशांतर्गत सरकारी अर्थसहाय्य (subsidy) असल्याने या वस्तूची किंमत वसूल होणे लांबच, उलट सरकारचा अजून पैसा खर्च होतो. यामुळे देशाला कर्ज घ्यावे लागते. हे कर्ज दिवसेंदिवस वाढतच आहे. जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर प्रगत देशांमध्ये भविष्यासाठी इंधनतेलाची साठवणूक करण्याची सुरू झालेली स्पर्धा ही इंधनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढविण्यात भर घालीत आहेत. परिणामी, ज्यांना विकासासाठी इंधनाशिवाय पर्याय नाही, अशा भारतासारख्या देशांचा इंधनावरील खर्च वाढतो आहे.

दुसरी आयात वस्तू म्हणजे सोने, असे म्हणतात की देशातील ९०% पेक्षा जास्त सोने आयात केले जाते. इतर उंची वस्तू, डाळी या भारताच्या व्यापार तूटीमध्ये भर घालणार्‍याच आहेत.   

रूपयाची किंमत घसरली, की परदेशी गुंतवणूकदारही आपापले भांडवल देशातून हलवितात, कारण मग त्यांचा नफा कमी होऊन त्यांना येथे व्यापार करणे परवडेनासे होते. भारताच्या हलाखीच्या परिस्थितीत ही आणखीनच भर.
चालू खात्यावरील तूट (current account deficit) कमी करणे  (चालू खातेज्यामध्ये देशाच्या दैनंदिन व्यवहारासाठी लागणाया वस्तूंची आयात दिसते, उदाहरणार्थ- इंधन, याची आयात कमी होईल हे पाहणे), परदेशी भांडवलाचा आटलेला ओघ पुन्हा सुरू होईल असे प्रयत्न करणे,  देशाच्या एकूण विकासाच्या घोडदौडीविषयी जगात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करणे (corruption, scams, poor infrastructure), राजकीय स्थैर्य प्रस्थापित करणे आणि उत्तरोत्तर वाढतच जाणार्‍या आर्थिक तूटीकडे गांभीर्याने पाहण्यास सुरवात करणे, हे रूपयाची घसरण रोखण्याचे देशासमोरचे मार्ग आहेत.
या वर्षभरात रूपया ५% ने घसरला असून रॉयटर्स या संस्थेने दैनंदिन आंतरराष्ट्रीय चलन निरीक्षणामध्ये रूपया हे आशिया खंडातील सर्वात खराब कामगिरी केलेले चलन आहे असे म्हटले आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये उच्चांक गाठल्यानंतर या ३ महिन्यांमध्ये रूपया १३% ने खाली घसरला आहे. रूपयाच्या या घसरणीला जागतिक मंदीमध्ये देशाची चालू खात्यावरील वाढत चाललेली तूट व ती कमी करण्यासाठी संथगतीने चाललेले अपुरे धोरणात्मक बदल हेच जबाबदार आहेत.


देश चालविण्यासाठी रोजच्या गरजेच्या लागणार्‍या वस्तूंसाठीचा खर्च कर्ज घेऊन भागविणे आपल्या देशाला काही नवीन नव्हते,  परंतु जागतिक मंदीच्या तडाख्यात न सापडता सुटका झाली असली तरी, आता मात्र भारतीय अर्थव्यवस्थेला दणके बसायला सुरूवात झाली आहे.    


-          मीनल इनामदार

1 comment:

  1. we always import 70% of crude so that may irrespective of consumption. and from last 20 days crude is in between 90 to 98 $ that s ok due to weak rupee we r not getting benefit. second u said abt gold to be exact 57 billion $ gold we imported in last 18 months which is main source of black money .every yr til 2010 we use to import 3 billion $ coal but last 2 yrs we r importing 17 billion $ coal which is 6 times higher. ppl r trading world wide euro vs $vs rupee that is also making rupee weak. so think on these few points also. bakki best

    ReplyDelete